दुष्काळमुक्तीसाठी वृक्षारोपण करा
By Admin | Updated: July 8, 2017 01:09 IST2017-07-08T01:09:23+5:302017-07-08T01:09:23+5:30
कोरड्या दुष्काळाप्रसंगी मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे,

दुष्काळमुक्तीसाठी वृक्षारोपण करा
पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : आलापल्ली येथे वृक्षारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : कोरड्या दुष्काळाप्रसंगी मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी शुक्रवारी केले.
आलापल्ली वन विभागाच्या मार्फतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन आलापल्लीत करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. आय. येटबॉन, आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक गिन्नीसिंह, भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरण बाला, अहेरीचे तहसीलदार प्रशांत घारूडे, वन विकास महामंडळ प्राणहिता विभागाचे विभागीय व्यवस्थापक वाघाये, अहेरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, आलापल्लीच्या सरपंच रेणुका कुळमेथे, उपसरपंच पुष्पा अलोणे, अहेरीच्या नगरसेविका हर्षा ठाकरे, माजी जि.प. सदस्य विजया विठ्ठलानी, शिला सिध्दीकी, वंदना सवरंगपथे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्य वनसंरक्षक यांनी पालकमंत्र्यांना रोपटे देऊन स्वागत केले.
पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वनांचे संरक्षण संवर्धनासाठी जिल्ह्याचे राज्यात कौतुक होत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपक्रमाचे देशभरात कौतुक होत आहे. येणाऱ्या पिढीला वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यात वनांचे जतन पूर्वजांकडून होत आले आहे. त्यामुळे जतन केलेल्या वनांचे संरक्षण करण्याची व वनक्षेत्र वाढविण्याची जबाबदारी भावी पिढीकडे आहे, असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक येटबॉन, संचालन उपवनसंरक्षक रवी अग्रवाल यांनी केले.
वनकर्मचाऱ्यांचा सत्कार
वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात वन विभागाचा विशेष वाटा आहे. नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यापासून तर वृक्ष उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाने पेलली आहे. त्याचबरोबर मोठ्या झालेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी वन विभागाला पेलावी लागणार आहे. वन संवर्धन तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात विशेष कार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.