आघाडी शासनाकडून योजनांचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 02:13 IST2017-02-10T02:13:22+5:302017-02-10T02:13:22+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला.

Plans for the Alliance Government | आघाडी शासनाकडून योजनांचा बट्ट्याबोळ

आघाडी शासनाकडून योजनांचा बट्ट्याबोळ

रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन : कुरखेडा शहरात जाहीर सभा
कुरखेडा : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला. महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आघाडी शासनच जबाबदार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.
कुरखेडा येथील गांधी चौकात गुरूवारी निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. मंचावर भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, सचिव विलास भांडेकर, अल्प संख्यांक आघाडी अध्यक्ष बबलू हुसैनी, तालुका अध्यक्ष राम लांजेवार, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, नागेश फाये, खेमनाथ डोंगरवार उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, आघाडी शासनाने सुमारे ७० हजार कोटी रूपये खर्च करीत फक्त एक टक्का सिंचन सुविधा निर्माण केली. या योजनेवर कोट्यवधी रूपये खर्च झाले असले तरी शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ झाला नाही. त्यामुळे शेतकरी मागे पडला आहे. आघाडी शासनाच्या बहुतांश योजना कुचकामी ठरल्याने भाजपा सरकारने या योजना बंद केल्या आहेत. शासनाने जलयुक्त शिवार ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एका वर्षात फक्त १ हजार ४०० कोटी रूपये खर्च करीत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. आघाडी शासनाने कालावधीत २४ टीएमसी पाणी अडविण्यासाठी आठ वर्षांचा दीर्घ कालावधी लागला व त्यावर पाच हजार कोटी रूपयांचा खर्च झाला. काँग्रेसचे नेते सोन्याच्या ताटात खाणारे काँग्रेसचे नेते म्हणजे, पुतना, मावशीचे प्रेम असल्याची टिकाही दानवे यांनी केली. भाजप सरकारच्या काळात गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर हाच केंद्रस्थानी आहे व त्यांच्यासाठीच विविध योजना राबविल्या जात आहे, असे त्यांनी सांगितले.
या जाहीरसभेत खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होण्यास मदत होईल. जिल्ह्याचा औद्योगिक विकास होण्यासाठीही शासन प्रयत्न करीत आहे. महामार्गांच्या निर्मितीमुळे उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे कामही लवकरच सुरू केले जाईल. या सर्व कामांसाठी निधी कमतरता केंद्र व राज्य शासन कधीच पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या जाहीर सभेचे प्रास्ताविक आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. त्यांनी विकासकामाचा पाढा वाचला. संचालन जिल्हा सचिव चांगदेव फाये तर आभार रवींद्र गोटेफोडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Plans for the Alliance Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.