फेंद्री नदीपुलाजवळील खड्डा धोकादायक
By Admin | Updated: August 19, 2016 00:52 IST2016-08-19T00:52:29+5:302016-08-19T00:52:29+5:30
धानोरा तालुक्यातील मुस्का ते खांबाळा मार्गावरील फेंद्री नदीवरील पुलाजवळील रस्ता खचला असल्याने मोठा खड्डा पडला आहे.

फेंद्री नदीपुलाजवळील खड्डा धोकादायक
आमदारांनी केली पाहणी : वाहन नदीत कोसळण्याचा धोका; अपघात वाढले
आरमोरी : धानोरा तालुक्यातील मुस्का ते खांबाळा मार्गावरील फेंद्री नदीवरील पुलाजवळील रस्ता खचला असल्याने मोठा खड्डा पडला आहे. सदर खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी बुधवारी या खड्ड्याची पाहणी केली. सदर खड्डा तत्काळ बुजविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
भाकरोंडी परिसरातील गावांमधील नागरिक ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच वर्दळ राहते. मुस्का ते खांबाळादरम्यान फेंद्री नदी आहे. या नदीवर पूल बांधण्यात आला आहे. मागील महिन्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसात पुलाजवळील पिचिंग व माती वाहून गेली. त्यामुळे अर्धाच रस्ता शिल्लक आहे. ट्रक, बस व इतर चारचाकी वाहने या ठिकाणावरून नेताने तारेवरची कसरत करावी लागते. रात्रीच्या सुमारास सदर खड्डा नजरेस न पडल्यास वाहन सरळ नदीमध्ये कोसळण्याचा धोका आहे.
याबाबतची माहिती या परिसरातील नागरिकांनी आ. क्रिष्णा गजबे यांना दिली असता, त्यांनी सदर खड्ड्याची पाहणी केली. पाहणीदरम्यान सदर खड्डा धोकादायकच असल्याचे लक्षात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली जाईल. त्याचबरोबर सदर खड्डा तत्काळ दुरूस्त करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)
आश्रमशाळेची पाहणी
याच मार्गावर असलेल्या भाकरोंडी येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आरोग्य, शिक्षण, भोजण व्यवस्थेबद्दल चर्चा करून माहिती जाणून घेतली. भाकरोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी चर्चा करून रुग्णालयातीलही सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.