पुलाजवळचा खड्डा धोकादायक
By Admin | Updated: August 29, 2016 02:13 IST2016-08-29T02:13:03+5:302016-08-29T02:13:03+5:30
चामोर्शी तालुक्यातील विसापूर रै. गावानजीकच्या नदीपुलाजवळ एक महिन्यापूर्वी पुरामुळे मोठा खड्डा पडला.

पुलाजवळचा खड्डा धोकादायक
अपघाताची शक्यता : विसापूर रै. नदीजवळ पुरामुळे रस्ता उखडला
आमगाव (म.) : चामोर्शी तालुक्यातील विसापूर रै. गावानजीकच्या नदीपुलाजवळ एक महिन्यापूर्वी पुरामुळे मोठा खड्डा पडला. परंतु सदर खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या खड्ड्याची दुरूस्ती करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याकडे लोकप्रतिनिधीही कानाडोळा करीत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील महिन्यात सुरूवातीला मेघ गर्जनेसह सतत चार दिवस पाऊस झाला. त्यामुळे विसापूर नजीकच्या नदीपुलावरून तीन दिवस पुराचे पाणी वाहत होते. या पाण्यामुळे पुलालगतच्या रस्त्यावर एका बाजुने मोठा खड्डा पडला. शिवाय पुलाच्या लगत रस्त्यावरील डांबरही वाहून गेले. त्यामुळे येथे खड्डा पडून गिट्टीही उखडली. दुचाकी, चारचाकी वाहनांना येथून आवागमन करणे अडचणीचे झाले. पुलालगत रस्त्याची कडा अरूंद आहे. काही भाग खचलेलाही आहे. या मार्गाने दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहने आवागमन करीत असतात. त्यामुळे येथून नेहमीच वर्दळ असते. अशा स्थितीत रस्ता योग्य असणे गरजेचे आहे. परंतु सदर पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने तो पुन्हा विस्तारण्याची शक्यता आहे. घोट, आमगाव महाल, विसापूर रै., खोर्दा, तळोधी भागातील नागरिक याच मार्गाने ये- जा करीत असतात. रात्रीच्या सुमारासही येथून वाहतूक असते. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन खड्डा तत्काळ बुजवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एक महिन्यापूर्वी सदर खड्डा पडला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आलेली नाही. लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन खड्डा तत्काळ बुजवावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)