परतीच्या बसफेरीअभावी विद्यार्थ्यांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST2021-02-17T04:44:09+5:302021-02-17T04:44:09+5:30
चामाेर्शी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळांमधील उपस्थिती वाढविण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून मुलींकरिता माेफत बससेवा उपलब्ध करून दिली. ...

परतीच्या बसफेरीअभावी विद्यार्थ्यांची पायपीट
चामाेर्शी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळांमधील उपस्थिती वाढविण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून मुलींकरिता माेफत बससेवा उपलब्ध करून दिली. मात्र, मानव विकास मिशनचे वेळापत्रक काेलमडल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना परतीचा प्रवास पायीच करावा लागत आहे. ही समस्या चामाेर्शी तालुक्यात ऐरणीवर आली आहे. मुलींच्या शैक्षणिक विकासासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना नि:शुल्क पासेस देऊन मानव विकास मिशन अंतर्गत बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, मानव मिशनच्या बसगाड्यांचे वेळापत्रक याेग्यरित्या बनविले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता मुरखळा (चक), जुनी व नवीन वाकडी, नागपूर चक, वागदरा आदी गावांमधून जवळपास १०० विद्यार्थी चामाेर्शीला येतात. बल्लू वाकडी या गावावरून महामंडळाची बस चामाेर्शीला विद्यार्थ्यांना घेऊन येते. परंतु, दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा गावी परतण्यासाठी बसफेरीच उपलब्ध नाही. परिणामी विद्यार्थ्यांना उपाशीपाेटी १२ ते १५ किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, ताप व अशक्तपणा यासारख्या आजारांना ताेंड द्यावे लागत आहे.
मानव मिशनची चामाेर्शीवरून बल्लू वाकडीला जाणारी दुपारी १२ वाजताची बस लवकर सुरू करावी, ही बस सुरू न केल्यास एस. टी. महामंडळाविराेधात आंदाेलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी राेहन बुरांडे, साेनल राेहणकर, स्नेहल लाकडे, प्रणाली वाळके, स्नेहा ठेमस्कर, सुप्रिया शेंडे, पायल राेहणकर, रागिनी साेनटक्के, निकिता ठेमस्कर, काजल काकडे, आकांशा पाेरटे आदी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी दिला आहे.