यात्रेकरू व व्यावसायिक परतीच्या मार्गावर
By Admin | Updated: March 5, 2017 01:28 IST2017-03-05T01:28:55+5:302017-03-05T01:28:55+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे २४ फेब्रुवारीपासून महाशिवरात्रीनिमित्त जत्रेला सुरूवात झाली.

यात्रेकरू व व्यावसायिक परतीच्या मार्गावर
सामान गुंडाळण्याचे काम सुरू : मार्र्कंडा यात्रेत झाली लाखोंची उलाढाल
मार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे २४ फेब्रुवारीपासून महाशिवरात्रीनिमित्त जत्रेला सुरूवात झाली. आता सात दिवसानंतर येथील व्यावसायिक व यात्रेकरूंनी परतीचा मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान यात्रेतील दुकानदारांनी आपले सामान जमा करण्याच्या कामास सुरूवात केली आहे. काही दुकानदारांचे जत्थे परतीच्या मार्गावर लागले आहे.
मार्र्कंडादेव येथील यात्रेमध्ये गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यांसह मुंबई, तसेच गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. व्यवसाय करण्यासाठी अनेक दुकानदारांनी येथे दुकान लावले होते. काही जणांनी मनोरंजनात्मक खेळही सुरू केले होते. पाच ते सहा दिवस या यात्रेत प्रचंड भाविक होते. मात्र सातव्या दिवसांपासून भाविकांची संख्या प्रचंड कमी झाल्याने व्यवसायावरही परिणाम होऊ लागला. यात्रा संपण्याच्या मार्गावर असल्याचे पाहून येथील व्यावसायिकांनी आपले दुकान गुंडाळण्याचे काम सुरू आहे. तसेच आकाशपाळणे, मौत का कुआ, सर्कस आदी ठिकाणचे साहित्य जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही आपले हॉटेल गुंडाळण्याचे काम हाती घेतले आहे. प्रशासनाने मार्र्कंडादेव येथे यात्रेदरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आरोग्य विभागातर्फे भरारी पथकाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, यावर्षीच्या यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही. याचे कारण आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेले नियोजन होय. यात्रेपूर्वीच सदर विभागाने बोट व इतर सुविधा येथे केल्या होत्या. (वार्ताहर)