पीएचसींना मिळणार तीन वैद्यकीय अधिकारी
By Admin | Updated: March 20, 2015 01:25 IST2015-03-20T01:25:24+5:302015-03-20T01:25:24+5:30
जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून यात पुन्हा सहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची भर पडली आहे.

पीएचसींना मिळणार तीन वैद्यकीय अधिकारी
चामोर्शी : जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून यात पुन्हा सहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची भर पडली आहे. शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या संबंधीचे आरोग्य संचालकांचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत होता. त्यामुळे रूग्णांना वेळीच आरोग्य सेवा प्राप्त होण्यास अडचण जात होती. आरोग्य सेवा सुधारण्याकरिता तत्कालीन जि. प. उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे यांनी आरोग्य सेवा संचालनाकडे सहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व नवीन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्याकरिता पत्र पाठविले होते. त्यानुसार आरोग्य संचालकांनी नवीन पदे व प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्या संदर्भातील पत्र २ फेब्रुवारीला पाठविले. या पत्रात जिल्ह्यात आलापल्ली, भेंडाळा, रंगय्यापल्ली, पिंपरी येथे नवीन चार प्राथमिक आरोग्य केंद्र व २०१४ च्या आराखड्यानुसार लखमापूर बोरी, बुर्गी येथे प्रत्येकी एक असे एकुण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता आकृतीबंधानुसार १५ पदे मंजूर करण्याचेही नमुद करण्यात आले आहे. शासनाच्या बृहत आराखड्यानुसार अधिक लोकसंख्या असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता आरोग्य सेविकांची १ हजार ७२, वैद्यकीय अधिकाऱ्यांची २१० व प्रयोगशाळा तंत्रज्ञांची ९१ पदे निर्माण करण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता मनुष्यबळ निर्माण करण्यात आले असले तरी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाल्यास सदर केंद्रांना अतिरिक्त पदे मंजूर केली जाणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)