वृक्षतोडविरोधात पाथरगोटावासीयांचा एल्गार
By Admin | Updated: January 24, 2016 01:11 IST2016-01-24T01:11:26+5:302016-01-24T01:11:26+5:30
येथून जवळच असलेल्या पाथरगोटा गावालगतच्या भगवानपूर बिटामध्ये वन विकास महामंडळाच्या वतीने झाडांची तोड करण्यात येत आहे.

वृक्षतोडविरोधात पाथरगोटावासीयांचा एल्गार
घटनास्थळी केले आंदोलन : दोन हजार झाडांची झाली कत्तल
जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या पाथरगोटा गावालगतच्या भगवानपूर बिटामध्ये वन विकास महामंडळाच्या वतीने झाडांची तोड करण्यात येत आहे. नवीन रोपवन लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगण्यात येत असले तरी झाडे नष्ट झाल्याने गावकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ५०० च्या वर नागरिकांनी बिटात जाऊन झाडांची तोड बंद करण्याचे आवाहन केले.
पाथरगोटालगतच्या भगवानपूर येथील वळणावर गरीब नागरिकांची उपजीविका पारंपरिक पध्दतीने चालत आहे. भगवानपूर बिटातील कक्ष क्रमांक ८३ मध्ये १ हजार २५ हेक्टर आरमध्ये मोठ्या झाडांची जंगल आहे. यात मोह, चारोळी, बेहडा वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. गरीब नागरिक मोहफूल, चारोळी, बेहडा गोळा करून आपली उपजीविका करीत आहेत. या माध्यमातून नागरिकांना वर्षभर रोजगार मिळत आहे. यातच सदर बिट वन विकास महामंडळाला सुपूर्द झाल्याने नवीन रोपवन लावण्याच्या नावाखाली नैसर्गिक व जुन्या झाडांची कत्तल केली जात आहे. सद्यस्थितीत चार ते पाच हेक्टरवरील दोन हजारपेक्षा अधिक झाडे कापण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून बिट कटाई बंद केली. यावेळी उपसरपंच शरद दोनाडकर, रूपचंद दोनाडकर, नारायण पिलारे, उत्तम मेश्राम, शारदा लोखंडे यांच्यासह जवळपास ५०० नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
भगवानपूर बिटात वन विकास महामंडळाच्या वतीने बिट कटाई सुरू आहे. वरिष्ठांच्या परवानगीनंतरच बिट कटाईचे काम हाती घेण्यात आले आहे व शासकीय आदेशानुसारच हे काम करण्यात येत आहे. झाडे तोडलेल्या ठिकाणी नवीन झाडांची लागवड केली जाणार आहे.
- यु. के. खडगी, वनरक्षक भगवानपूर