लोकप्रतिनिधी बदलले समस्या मात्र जैसे थेच
By Admin | Updated: March 19, 2015 01:24 IST2015-03-19T01:24:08+5:302015-03-19T01:24:08+5:30
अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात विविध समस्या असून या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

लोकप्रतिनिधी बदलले समस्या मात्र जैसे थेच
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात विविध समस्या असून या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी, सरकार बदलले मात्र समस्या सुटण्याच्या दृष्टीने काहीही हालचाली दिसत नसल्याने सर्वसामान्य नागरिक निराश झाले आहेत.
कमलापूर येथे एक खासगी हायस्कूल व एक प्राथमिक शाळा आहे. बऱ्याच वर्षांपासून या शाळा सुरू आहेत. मात्र संस्थांनी इमारत बांधली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना येथे अडचणीत शिक्षण घ्यावे लागत आहे. कमलापूरला मानव विकास मिशनची बस येते. मात्र जिल्हास्तरापर्यंत जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुका आल्या. मतदारांना आश्वासने मिळाली. मात्र त्यानंतर कुठेही विकासाचे चित्र दिसून आले नाही. गेल्यावेळी दीपक आत्राम आमदार होते. जिल्हा परिषद मतदार संघात राणी रूख्मीनीदेवी निवडून आल्या. सध्या लोकसभेत अशोक नेते व विधानसभेत अम्ब्रीशराव आत्राम निवडून आलेत. मात्र विकासाचे कुठलेही चित्र बदलले नाही. परिस्थिती जशी आहे तशीच कायम आहे. लोकप्रतिनिधी नवे असले तरी या भागाकडे त्यांनी निवडणुकीनंतर दौराही केला नाही. (वार्ताहर)