ग्रामस्थांनी श्रमदानातून उपसला सार्वजनिक विहिरीतील गाळ
By Admin | Updated: May 6, 2016 01:11 IST2016-05-06T01:11:18+5:302016-05-06T01:11:18+5:30
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरी बुजल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांनी श्रमदानातून उपसला सार्वजनिक विहिरीतील गाळ
आसरअल्ली ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनीच केली विहिरींची स्वच्छता
आसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरी बुजल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेउन श्रमदानातून बोरगुड्डम वार्डातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ उपसून स्वच्छता केली.
अत्यल्प पावसामुळे यंदा सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, झिंगानूर परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी शेकडो विहिरी आत्ताच कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नाल्यातून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. आसरअल्ली गावातही उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. आसरअल्ली येथील बोरगुड्डम वार्डातील महसूल विभागाच्या इमारतीजवळची ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर गेल्या अनेक वर्षांपासून बुजली होती. या संदर्भात वार्डातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्या व या विहिरींतील गाळ उपसण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वार्डातीलच महिला, पुरूष व मुलांनी एकत्र येऊन श्रमदानातून विहिरीतील गाळ उपसण्याचे काम केले. चार दिवस सदर काम केल्यावर या विहिरीला पाणी लागले. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात पाण्याची सुविधा झाली आहे. (वार्ताहर)
आठवडाभरापासून वीजबत्ती गूल; नळ पाणी पुरवठा ठप्प
अवकाळी वादळी पावसामुळे आसरअल्ली भागातील वीज खांब वाकले तसेच काही ठिकाणच्या तारा लोंबकळत आहेत. परिणामी आसरअल्ली येथील वीज पुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद आहेत. यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने होणारा नळ पाणी पुरवठा बंद झाला आहे. परिणामी गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र या साऱ्या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन व महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.
बोरगुडम वार्डात पाणी टंचाई तीव्र होणार
आसरअल्ली गावातील बोरगुडम येथील नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन श्रमदानातून सार्वजनिक विहिरींची गाळ उपसा करून स्वच्छता केली. त्यामुळे या विहिरीला काही प्रमाणात पाणी लागले आहे. मात्र ग्रामपंचायत या विहिरींचे खोलीकरण न केल्यास १५ दिवसानंतर पुन्हा या वार्डात पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.