लोकाभिमुख योजनांची जागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:30+5:30

माहिती व प्रसारण मंत्रालय पुणे येथील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोद्वारा गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात सांस्कृतिक कलाकारांसाठी शुक्रवारी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

People-oriented schemes need awareness | लोकाभिमुख योजनांची जागृती हवी

लोकाभिमुख योजनांची जागृती हवी

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : गोंडवन कला दालनात केंद्र सरकारच्या योजनांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना तळागळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती करावी, असा सूर सीआरपीएफ १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी यांच्यासह मान्यवरांनी काढला.
माहिती व प्रसारण मंत्रालय पुणे येथील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोद्वारा गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात सांस्कृतिक कलाकारांसाठी शुक्रवारी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यशाळेला सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, प्रादेशिक लोकसंपर्क संचालक संतोष अजमेरा, द्वितीय कमान अधिकारी टी.के.सोलंकी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्यवक अमित पुंडे उपस्थित होते. प्रास्ताविकातून संतोष अजमेरा यांनी तळागळातील लोकांचा विकास साधण्यासाठी लोक कलावंतांनी स्थानिकांचा विश्वास संपादन करून आपल्या उद्बोधन व प्रबोधन कार्यक्रमादरम्यान पोटतिडकीने कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याचे काम करावे, असे सांगितले. जिल्ह्याच्या सर्व घटकातील लोकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत त्यांच्याच भाषेत माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. तेव्हाच ग्रामीण व दुर्गम भागातील विकास साधता येईल, असे मत टी.के.सोलंकी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी जिल्ह्यात सात स्थानिक भाषा बोलल्या जातात, असे सांगितले. यावेळी शांतीलाल सेता, अमित पुंडे व गुरूदास सेमस्कर यांनीही मार्गदर्शन केले. संचालन ब्युरोचे व्यवस्थापक किरण भुजभळ व पंकज दाभाडे व आभार क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी मानले.

सात संच करणार योजनांबाबत प्रबोधन
गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यांमधील गावांमध्ये जाऊन केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी जवळपास १०० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सांस्कृतिक कलाकारांचे सात संच नेमण्यात आले आहेत. संचाद्वारे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन नागरिकांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली जाईल. तसेच या योजनांचे स्वरूप, व्याप्ती सांगून त्यांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित सुद्धा केले जाणार आहे. अशाप्रकारे कलाकारांचे संच काम करणार आहेत.

Web Title: People-oriented schemes need awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.