छत्तीसगडवासीयांमुळे कोरचीत मिठ तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:01:28+5:30

कोरची तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. लॉकडाऊनमुळे छत्तीसगड राज्यातील दुकानांमध्ये मिठाचा पुरवठा मागील काही दिवसांपासून बंद झाला आहे. त्यामुळे छत्तीसगडवासीयांना मिठाचा तुटवडा जाणवत आहे. छत्तीसगड राज्यातील नागरिकांचे काही नातेवाईक कोरची तालुक्यात आहेत.

The people of Chhattisgarh are short of salt | छत्तीसगडवासीयांमुळे कोरचीत मिठ तुटवडा

छत्तीसगडवासीयांमुळे कोरचीत मिठ तुटवडा

ठळक मुद्देदुप्पट भाव : नातेवाईक खरेदी करीत आहेत मिठ

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : छत्तीसगड राज्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिक स्वत:च्या नातेवाईकांना कोरची तालुक्यातील दुकानांमधून ठोक स्वरूपात मिठ खरेदी करण्यास सांगत आहेत. परिणामी मिठाची अचानक मागणी वाढून कोरची तालुक्यातील दुकानांमध्ये मिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
कोरची तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. लॉकडाऊनमुळे छत्तीसगड राज्यातील दुकानांमध्ये मिठाचा पुरवठा मागील काही दिवसांपासून बंद झाला आहे. त्यामुळे छत्तीसगडवासीयांना मिठाचा तुटवडा जाणवत आहे. छत्तीसगड राज्यातील नागरिकांचे काही नातेवाईक कोरची तालुक्यात आहेत. ते आपल्या नातेवाईकांना फोन करून मिठ खरेदी करून ठेवण्याचे सांगत आहेत. त्यामुळे अचानक मिठाची मागणी वाढली आहे. लॉकडाऊनच्या अगोदर मिठाची एक बॅग १६० रुपयांना घेतली जात होती. आता तीच बॅग ३०० रुपयांना विकली जात आहे. तरीही नागरिक मिठाच्या बॅग खरेदी करीत आहेत. काही नागरिक तर दोन ते तीन बॅग खरेदी करून आपल्या नातेवाईकांना पाठवत आहेत. मिठाचा तुटवडा निर्माण झाल्याने १० रुपयाला मिळणारे मिठाचे पॉकीट ५० रुपये दराने विकले जात आहे. अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गोंदिया जिल्ह्यातही मिठ मिळेना
कोरची तालुक्यातील दुकानदार गोंदिया येथून ठोक स्वरूपात किराणा माल आणतात. गोंदिया येथील व्यापाऱ्यांकडे सुध्दा मिठ उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात मिठाची टंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन काही नागरिक आवश्यकतेपेक्षा अधिक मिठ खरेदी करून ठेवत आहेत. त्यामुळेही मिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
 

Web Title: The people of Chhattisgarh are short of salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.