जादूटोणाच्या कारणावरून मारहाण करणाऱ्यांना शिक्षा
By Admin | Updated: July 15, 2016 01:45 IST2016-07-15T01:45:56+5:302016-07-15T01:45:56+5:30
जादूटोणाच्या संशयावरून मरेपर्यंत मारहाण करणाऱ्या १० आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

जादूटोणाच्या कारणावरून मारहाण करणाऱ्यांना शिक्षा
वडधा येथील घटना : १० आरोपींना झाला कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
गडचिरोली : जादूटोणाच्या संशयावरून मरेपर्यंत मारहाण करणाऱ्या १० आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर प्रत्येकावर २०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
वडधा येथील मंजुळाबाई बोंडकू मेश्राम हिने तिचा मुलगा गजानन हा जादूटोणामुळेच एक आठवड्यापासून आजारी आहे व जादूटोणा जनार्धन कावरे याने केला असल्याचा तिला गैरसमज झाला होता. ११ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळच्या सुमारास मृतक जनार्धनची पत्नी देवकाबाई व मृतक जनार्धन कावरे हे शेतावरून आले होते. त्याचवेळी मंजुळाबाईचा पुतन्या मोरेश्वर मेश्राम व धुंडेशिवणी येथील कालिदास कांबळे हे जनार्धनच्या घरासमोर येऊन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. लाथाबुक्क्यांमुळे जनार्धन जखमी होऊन खाली कोसळला. पहाटेच्या सुमारास जनार्धन त्याच ठिकाणी मृतावस्थेत पडून होता. याबाबतची तक्रार मृतक जनार्धनची पत्नी देवकाबाई हिने आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. या प्रकरणाचा निकाल गुरूवारी लागला. यामध्ये मंजुळाबाई बोंडकू मेश्राम, मोरेश्वर हरीजी मेश्राम, विलास मानू मेश्राम या तीन आरोपींना कलम ३२६, १४९ अन्वये पाच वर्ष कारावास व २०० रूपये दंड सुनावला आहे. सुधीर सोनूजी मेश्राम, कालिदास मुखरू कांबळे, कृष्णा ननू मेश्राम, चंद्रकला उर्फ संगीता हरीजी मेश्राम, ज्योती उर्फ हरीजी मेश्राम, उर्मिला विलास मेश्राम यांना भादंवि कलम ३२३, १४९ सहा महिने कारावास व २०० रूपये दंड सुनावला आहे. हरीजी ननू मेश्राम याला कलम १४७ अन्वये सहा महिने व २०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर शिक्षा प्रमुख सत्र न्यायाधिश सूर्यकांत शिंदे यांनी सुनावली. प्रकरणाचा तपास पीएसआय अजित कुलीराम सिद यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. न्यायालयात कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पीएसआय जयेश खंदरकर, नितीन शिंदे यांनी कामगिरी बजावली.