पदयात्रेकरू तहसीलवर धडकले
By Admin | Updated: February 3, 2016 01:26 IST2016-02-03T01:26:06+5:302016-02-03T01:26:06+5:30
मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाला लोकांचा विरोध होत असल्याचे पाहून गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मंगळवारी पोचमपल्लीनजीकच्या मेडिगट्टा सिंचन प्रकल्पस्थळाला भेट दिली.

पदयात्रेकरू तहसीलवर धडकले
तहसीलदारांना निवेदन : पोचमपल्लीतून निघालेल्या शांती पदयात्रेचा सिरोंचात समारोप
कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही - पालकमंत्र्यांचे आश्वासन
मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाला लोकांचा विरोध होत असल्याचे पाहून गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मंगळवारी पोचमपल्लीनजीकच्या मेडिगट्टा सिंचन प्रकल्पस्थळाला भेट दिली. येथील नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर सिरोंचा पंचायत समितीसमोर पदयात्रेकरूंची भेट घेतली. मेडिगट्टा सिंचन प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली नाही. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील गावांना धोका पोहोचणार असल्यास आपणही या प्रकल्पाला विरोध करू, या सिंचन प्रकल्पाबाबत काही लोक अफवा पसरवित असून भितीचे वातावरण निर्माण करीत आहेत. अफवांच्या आहारी जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सिरोंचा तालुक्यातील एकाही नागरिकांचे या प्रकल्पामुळे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पदयात्रेकरूंना दिले.
मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा भागातील २२ गावे बुडीत क्षेत्रात जाणार आहे. शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिंचन प्रकल्पाला विरोध सुरू आहे. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या विरोधात दुसऱ्या दिवशी मंगळवारी पेंटीपाका येथून शांतीपदयात्रेला सुरूवात झाली. लंबडपल्ली, मुगापूर, मृदूक्रिष्णापूर, राजन्नापल्ली, आरडा मार्गे जानमपल्ली, मदीकुंटा, मंडलापूर, चिंतलपल्ली, नरगममार्गे लिंगमपल्ली, धर्मपूरीला पदयात्रा पोहोचली. येथून रामंज्जापूर, नासीरखॉनपल्ली, सिरोंचा माल येथून सदर पदयात्रा सिरोंचात पोहोचली. सिरोंचा बसस्थानक, वन विभाग, ग्रामीण रूग्णालय मार्गे, पंचायत समिती चौकातून सदर शांतीपदयात्रा तहसील कार्यालयाकडे पोहोचली. पेंटीपाकापासून सिरोंचापर्यंत १६ किमी अंतर पदयात्रेकरूंनी कापले. या यात्रेदरम्यान प्रत्येक गावी गावकऱ्यांना मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीची सविस्तर माहिती देण्यात आली. या शांतीपदयात्रेदरम्यान जय जवान, जय किसान, मेडिगट्टाचे सर्वेक्षण बंद करा, शेतकऱ्याला गळफास लावू नका, २१ व्या शतकात २१ गावांना बुडवू नका, अशा घोषणा पदयात्रेकरूंनी दिल्या. पदयात्रेकरूंच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सिरोंचाचे तहसीलदार कुमरे यांना दिले. यावेळी नायब तहसीलदार कडार्लावार उपस्थित होते. निवेदन देताना मेडिगट्टा धरणविरोधी समितीच्या किसान आघाडीचे अध्यक्ष मधुसूदन आरवेली, सतीश भोगे, सत्यम गोरा, किरण वेमुला, पोचम सदुला, विनोद गुरूसिंग, मनिकंटा वेमुला, विशाल मच्चिडी, योगेश वेमुला, राजमल्लू पदाबोईना, क्रिष्णमनोहर येरोला, प्रभाकर गोगुला, नागराजू गड्डम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)