येडसीडीवासीयांना पायवाटेचाच आधार
By Admin | Updated: September 6, 2015 01:22 IST2015-09-06T01:22:46+5:302015-09-06T01:22:46+5:30
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील येडसीडी गावाला जाण्यासाठी मार्गच नसल्याने या गावातील नागरिकांना पायवाटेचा आधार घ्यावा लागत आहे.

येडसीडीवासीयांना पायवाटेचाच आधार
रस्ता बांधकामाची मागणी : बीडीओंना निवेदन
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील येडसीडी गावाला जाण्यासाठी मार्गच नसल्याने या गावातील नागरिकांना पायवाटेचा आधार घ्यावा लागत आहे. सदर रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
येडसीडी येथे जवळपास ६० कुटुंब असून गावाची लोकसंख्या १८२ एवढी आहे. येडसीडी गाव मुख्य रस्त्यापासून दोन किमी अंतरावर जंगलात वसले आहे. सदर दोन किमी मार्ग ६० वर्ष उलटूनही बांधण्यात आला नाही. त्यामुळे पायवाटेनेच नागरिकांना मुख्य मार्गापर्यंत यावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात पायवाटेवर चिखल निर्माण होत असल्याने मार्गक्रमण करणे कठीण होते. सदर मार्ग निर्मितीबाबत येडसीडीवासीयांनी अनेकवेळा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या मार्गाच्या निर्मितीबाबत अनेकवेळा कळविण्यात आले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देऊन रस्ता बांधकामाची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशरासुध्दा दिला आहे. निवेदन देतेवेळी पोलीस पाटील बक्का आत्राम, रमेश दुर्गम यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)