पर्लकोटा नदीचा जलस्तर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 02:08 IST2016-08-03T02:07:49+5:302016-08-03T02:08:37+5:30
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामध्ये गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही.

पर्लकोटा नदीचा जलस्तर वाढला
जिल्ह्यात ३५.९ मि.मी. पाऊस : रोवणीच्या कामाला वेग
गडचिरोली : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामध्ये गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. अधूनमधून हलक्याशा सरी बरसल्या. मात्र मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३५.९ मीमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने घेतली आहे. बऱ्याच दिवसानंतर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला असून धानपिकाच्या रोवणीस वेग आला आहे. पावसामुळे भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा जलस्तर वाढला असून भामरागड-कोठी मार्गावर असलेल्या नाल्यावर काही तास पाणी चढले होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बस काहीवेळ थांबली. नाल्यावरील पूर ओसरल्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली.
गेल्या २४ तासात गडचिरोली तालुक्यात २०.३ मीमी, कुरखेडा तालुक्यात १८.५, आरमोरी ४३.९ मीमी, चामोर्शी २९.२ मीमी, सिरोंचा ७ मीमी, अहेरी ८२.५ मीमी, एटापल्ली ७९.४ मीमी, धानोरा ३२.९ मीमी, मुलचेरा ३१.४ मीमी व भामरागड तालुक्यात ७८ मीमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्यात जून महिन्यापासून आतापर्यंत ८८२.७ मीमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे अहेरी, एटापल्ली व भामरागड तालुक्यात गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली आहे. गडचिरोली तालुक्यासह शहरातही गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)