लॉकडाऊनमधील ३०% वीज बिलाचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:22+5:30
लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे.

लॉकडाऊनमधील ३०% वीज बिलाचा भरणा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनमुळे मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये विजेच्या मिटरची रिडिंग करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. काही ग्राहकांनी बिल भरले तर काहींनी मात्र बिल भरलेच नाही. लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कालावधीत मिटर रिडिंगचेही काम बंद ठेवण्यात आले होते. स्वत: मिटर रिडिंग घेऊन ते महावितरणच्या अॅपवर टाकण्याची सुविधाही ग्राहकांना देण्यात आली होती. मात्र या बाबातचे तांत्रिक ज्ञान ग्राहकांना नसल्याने बहुतांश ग्राहकांनी स्वत: मिटर रिडिंग केली नाही. ज्या ग्राहकांनी मिटर रिडिंग केली नाही. त्यांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. मार्च ते मे या कालावधीत उन्हाळा होता. तसेच संपूर्ण कुटुंब घरीच राहत होते. त्यामुळे कुलर, एसी, पंखे, टिव्ही या साधनांचा वापर वाढला होता. बील मात्र सरासरीच पाठविले जात होते. त्यामुळे वीज बिलातील तफावत वाढत गेली. काही ग्राहकांनी तर लॉकडाऊनच्या कालावधीत वीज बिलाचा भरनासुद्धा केला नाही. त्यामुळे त्यांना आता तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे. अशातच तीन महिन्यांचे वीज बिल एकाचवेळी पाठविण्यात आल्याने ते भरावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांनी ते भरले नसल्याचे दिसून येते. घरगुती ग्राहकांकडून वीज बिलाची १० कोटी ९९ लाख रूपयांची मागणी होती. त्यापैकी ३ कोटी २८ लाख रूपयांचे बिल ग्राहकांनी भरले आहे. तसेच व्यावसायिक ग्राहकांकडे १ कोटी १२ लाख रूपयांची मागणी होती. त्यापैकी ५३ लाख रूपये भरले आहेत. औद्योगिक ग्राहकांककडून ९३ लाख रूपयांच मागणी होती. त्यापैकी १ कोटी ५० लाख रूपयांचा भरणा या ग्राहकांनी केला आहे.
शंखांचे निरसन सुरूच
प्रत्यक्ष वीज बिल वापराच्या तुलनेत अधिकचे बिल पाठविण्यात आले असल्याची शंका काही ग्राहकांना आहे. त्यामुळे ते महावितरणकडे तक्रारी करीत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निरसण व्हावे यासाठी महावितरण तर्फे वेळोवेळी वेबिणार आयोजित केले जात आहेत. तसेच तालुका स्तरावर तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्याही तक्रारींचे निरसन केले जात आहे.
रोवणीच्या खर्चामुळे रखडली वीज बिले
जून महिन्यात लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. या महिन्यापासूनच खरीपच्या हंगामाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांकडे असलेल्या पैशातून त्यांनी खते, बियाणे खरेदी केली. तसेच धानाच्या रोवणीसाठी तजवीज करून ठेवली. त्यामुळे वीज बिल भरू शकले नाहीत. तर मजूर वर्ग लॉकडाऊनच्या कालावधीत बेरोजगार झाला होता. जमा असलेली पुंजी या कालावधीत संपली. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर रोजगार सुरू झाला. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत महावितरणला वीज बिलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.