रस्ते व पुलांसाठी दरवर्षी ५० कोटी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:01:33+5:30

मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सादीकरण करा, आपण निधी देवू असा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन, आपत्ती निवारणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

Pay Rs 50 crore every year for roads and bridges | रस्ते व पुलांसाठी दरवर्षी ५० कोटी द्या

रस्ते व पुलांसाठी दरवर्षी ५० कोटी द्या

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : भामरागड येथील गरोदर महिलेचा मृत्यू ही दुर्दैवी घटना- पालकमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात पावसाळ्यादरम्यान जाण्या-येण्यासाठी किमान वाहन जाऊ शकेल आणि वाहनाने दवाखान्यांपर्यंत जाता येईल यासाठी आवश्यक भौतिक सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी दरवर्षी ५० कोटी रुपये अतिरिक्त देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सादीकरण करा, आपण निधी देवू असा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन, आपत्ती निवारणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
मागील आठवड्यात गरोदर मातेला दवाखान्यात जाण्यासाठी २३ किलोमीटर चालत जावे लागले तर दुसरी एक गरोदर महिला दवाखान्यात जाताना दगावली. या अतिशय दुर्दैवी घटना असून अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी अतिरिक्त निधीतून रस्ते व पूल उभारणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात निम्म्याहून अधिक सीआरपीएफचे जवान आहेत. संख्या वाढत असली तरी त्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. आवश्यक ठिकाणी गरजेनुसार कन्टेनमेंट झोन तयार करत आहोत. असे असले तरी प्रत्येक नागरिकांनी संसर्गाबाबत खबरदारी घेणे आवश्यकच आहे.
मुलचेरा, कुरखेडा व अहेरी येथील एक-दोन रु ग्ण सोडले तर जिल्हयात सर्वच जण बाहेरून आलेले व संस्थात्मक विलगीकरणातील रुग्ण आहेत. इतर जिल्हयाच्या तुलनेत जिल्ह्यात ९ हजार ५०० कोविड तपासण्या झाल्या आहेत.
सर्वात जास्त तपासण्यांमुळे कोरोना साखळी वेळीच थांबविण्यास मदत मिळते. लोकांनी फक्त काळजी घ्यावी, प्रशासन सर्वोतोपरी आपल्यासोबत आहे असे पालकमंत्री म्हणाले.

विद्यापीठाकडील ७० कोटीतून सुविधा निर्मिती
गोंडवाना विद्यापीठाकडे जागेच्या खरेदीसाठी मिळालेले ७० कोटी रुपये हे नवीन सुविधा निर्मितीसाठी खर्च करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या ३५ एकर जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. या परिस्थितीत सदर शिल्लक निधी खर्च करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. अजून १० ते १५ एकर जागा घेवून उर्वरित निधी सुविधांवर खर्च करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे ५०-६० एकर जागेत विविध सुविधा तयार करण्यासाठी सदर शिल्लक निधीची परवानगी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी लवकरच अद्यावत अभ्यासिका
जिल्हा क्रीडांगणाला २७ कोटी रूपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. युवकांना क्रीडा कौशल्य दाखविण्याची व ते वृद्धींगत करण्याची संधी यामुळे मिळेल. याशिवाय रोजगार व विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अभ्यासिका यावर्षी सुरु करण्याची तयारी झाली आहे. आदिवासी विभागातून त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. गडचिरोलीतील जिल्हा ग्रंथालयाच्या मागे उपलब्ध असलेल्या जागेत ही अद्यावत अभ्यासिका लवकरच सुरु होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता येईल, असे ना.वडेट्टीवार म्हणाले.

Web Title: Pay Rs 50 crore every year for roads and bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.