कोठी भागातील समस्यांकडे लक्ष द्या!
By Admin | Updated: April 6, 2017 01:41 IST2017-04-06T01:41:47+5:302017-04-06T01:41:47+5:30
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर आरोग्य,

कोठी भागातील समस्यांकडे लक्ष द्या!
पोलीस अधीक्षकांना साकडे : जनसंपर्क बैठकीतून पोलिसांकडे आल्या तक्रारी
गडचिरोली : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर आरोग्य, शिक्षण आदीबाबत समस्या आहेत. या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी ३ एप्रिल रोजी कोठी येथे पार पडलेल्या पोलीस विभागाच्या जनसंपर्क बैठकीत केली. त्या अनुषंगाने कोठी पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना पत्र लिहून या समस्यांची माहिती दिली आहे.
भामरागड तालुक्याचा संवेदनशील व अविकसित भाग असलेल्या कोठी येथे पोलीस मदत केंद्राच्या पुढाकाराने ३ एप्रिल रोजी जनसंपर्क मेळावा घेण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी आपल्या अडचणी पोलीस अधिकाऱ्यांकडे मांडल्या. कोठी हे गाव तालुक्यापासून सर्वात लांब अंतरावर असलेले दुर्गम गाव आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने व रुग्णवाहिकेचे वाहन नसल्यामुळे मोठ्या आजाराच्या रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे येथे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. कोठी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद भरण्यात यावे व एक रुग्णवाहिका मंजूर करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासोबतच शासकीय आश्रमशाळा कोठी येथे वर्ग १ ते १० मधील शिक्षकांची संख्या कमी असल्याने मुलांना शैक्षणिक अध्यापनाच्या कामात अडचण निर्माण झाली आहे. अनेकांना शिकविलेच जात नाही. त्यामुळे कोठी शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची पदे तत्काळ भरण्यात यावी, असेही या ग्रामस्थांनी म्हटले आहे.
शासनाच्या सोयीसुविधेपासून हा भाग वंचित आहे. या समस्यांचे निराकरण करून शासनाप्रती नागरिकांमधील विश्वास वृंद्धीगत करावा, अशी मागणीही या नागरिकांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर कोठी पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. आता आदिवासी विकास व आरोग्य विभाग काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)