रूग्णांनी जिल्हा रूग्णालय हाऊसफुल्ल
By Admin | Updated: September 9, 2015 01:27 IST2015-09-09T01:27:22+5:302015-09-09T01:27:22+5:30
वातावरणात अचानक बदल झाल्याने व गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्यामुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या वाढली आहे.

रूग्णांनी जिल्हा रूग्णालय हाऊसफुल्ल
डेंग्यूचे तीन रूग्ण आढळले : खाटाअभावी रूग्णांची गैरसोय
गडचिरोली : वातावरणात अचानक बदल झाल्याने व गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्यामुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने रूग्ण येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याने सामान्य रूग्णालय सध्या हाऊसफुल्ल झाले असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात पुरूषांच्या वार्डात डेंग्यूबाधित तीन रूग्ण दाखल आहेत. याच वार्डात मलेरियाबाधीत तीन रूग्ण उपचार घेत आहेत. वाढत्या रूग्णांच्या संख्येत जिल्हा रूग्णालयात खाटांची कमतरता असल्याने शेकडो रूग्णांना खाली गादीवर झोपून उपचार घ्यावा लागत आहे. मंगळवारी सकाळी पुरूषांच्या वार्डात जवळपास ४५ रूग्ण दाखल होते. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने रूग्ण या वार्डात दाखल होत असल्याचे वार्डाचे प्रभारी असलेल्या परिचारिकांनी सांगितले. रूग्णांच्या संख्येत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. मंगळवारी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे रूग्णांचे प्रचंड हाल झाले. (स्थानिक प्रतिनिधी)