चामोर्शी ग्रामीण रूग्णालय रूग्णांनी फुल्ल
By Admin | Updated: September 19, 2016 01:55 IST2016-09-19T01:55:09+5:302016-09-19T01:55:09+5:30
चामोर्शी परिसरातील ग्रामीण भागात दमट वातावरणामुळे तापाची साथ पसरली असून यामुळे ग्रामीण रूग्णालय फुल्ल झाले आहे.

चामोर्शी ग्रामीण रूग्णालय रूग्णांनी फुल्ल
अपुरी बेड व्यवस्था : ग्रामीण भागात तापाची साथ वाढली
चामोर्शी : चामोर्शी परिसरातील ग्रामीण भागात दमट वातावरणामुळे तापाची साथ पसरली असून यामुळे ग्रामीण रूग्णालय फुल्ल झाले आहे. ३० खाटांच्या या रूग्णालयात ५० पेक्षा अधिक रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांना फरशीवर गादीवर झोपून उपचार घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
चामोर्शी हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्यातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा भार येथील ग्रामीण रूग्णालयावर अवलंबून आहे. त्यामुळे या रूग्णालयात वर्षभर गर्दी राहते. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून अनेक रूग्ण चामोर्शी येथे उपचारासाठी भरती केल्या जाते. त्याचबरोबर गंभीर स्थितीतील रूग्णाला सर्वप्रथम चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात भरती करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात व त्यानंतर त्याला गडचिरोली येथे पुढील उपचारासाठी पाठविले जाते. त्यामुळे या रूग्णालयात भरती होणाऱ्या रूग्णांची नेहमीच गर्दी राहते. बाह्यरूग्ण विभागात सुध्दा सद्य:स्थितीत दरदिवशी ३०० ते ३५० रूग्ण उपचार घेत आहेत. उपजिल्हा रूग्णालय स्थापन करावे अशी मागणी नागरिकांकडून लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली आहे. उपजिल्हा रूग्णालय झाल्यास या रूग्णालयात अधिक सुविधा राहतील. जास्त खाटा राहत असल्यामुळे रूग्णांवर खाली झोपून उपचार घेण्याची वेळ येणार नाही. (शहर प्रतिनिधी)