लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने स्थापन केलेल्या रुग्ण कल्याण समित्या सध्या पूर्णपणे कार्यरत आहेत. त्यांच्या नियमित बैठकांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडत आहेत. या समित्यांमुळे रुग्णालयांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या सोडवण्यात मदत होत आहे.
रुग्ण कल्याण समिती ही एक स्वयंसेवी संस्था आहे, जी सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि रुग्णांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी काम करते. या समित्या रुग्णालयांच्या दैनंदिन कामकाजात सहकार्य करतात व निधीचा योग्य वापर सुनिश्चित करतात. दरम्यान, जिल्हास्तरावरूनही सर्व अधिकारी झालेल्या बैठकांचा आढावा घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
गत वर्षभरात किती बैठका ?गेल्या वर्षभरात, रुग्ण कल्याण समित्यांच्या प्रत्येक महिन्याला नियमित बैठका झाल्या आहेत. यामुळे रुग्णालयांमधील समस्यांवर वेळेत तोडगा काढणे शक्य झाले आहे.
जिल्ह्यात समिती कोठे उपलब्ध ?जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र स्तरावर रुग्ण कल्याण समिती कार्यरत आहे. यामुळे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंतच्या आरोग्य सुविधांवर या समित्यांचे लक्ष आहे.
राजकीय प्रतिनिधींचाही असतो सहभागया समित्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांचाही समावेश असतो. सध्या सदस्य उपलब्ध नसल्याने तालुका आरोग्य अधिकारीच या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. नियामक आणि कार्यकारी अशा दोन समित्या प्रत्येक ठिकाणी कार्यरत असतात. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज असल्याने अधिकारीच कामकाज पाहत आहेत.
वर्षाला दीड लाखाचा निधीप्रत्येक रुग्ण कल्याण समितीला निधीची तरतूद केली जाते. वर्षाला जवळपास एक ते दीड लाख रुपयांचा निधी उपलब्ध असतो. हा निधी रुग्णांचे कल्याण, अत्यावश्यक वस्तूंची खरेदी, रुग्णालयांची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी वापरला जातो. यामुळे रुग्णालयांना तत्काळ गरजा पूर्ण करता येतात.
समितीमार्फत कोठे-कोठे केल्या सुधारणा ?या समित्यांच्या माध्यमातून अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यात औषधांची उपलब्धता, स्वच्छता राखणे, तसेच रुग्णांसाठी प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचा समावेश आहे. यामुळे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळत आहेत.
"रुग्ण कल्याण समित्यांमुळे स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. समित्यांमुळे मिळणारा निधी व नियमित बैठकांमुळे रुग्णालयांच्या अडचणी तातडीने सोडवणे सोपे झाले आहे."- डॉ. रूपेश पेंदाम, साथरोग अधिकारी, जि. प. गडचिरोली