अवैध लाकडांवर पासिंग हातोडा
By Admin | Updated: October 14, 2014 23:18 IST2014-10-14T23:18:33+5:302014-10-14T23:18:33+5:30
येथून जवळच असलेल्या पाथरगोटा आणि अंतरजी येथील शेतकऱ्यांच्या साग व बिजा या मौल्यवान प्रजातीच्या झाडांची कंत्राटदारामार्फत जून महिन्यामध्ये तोड करण्यात आली. एका ठिकाणी

अवैध लाकडांवर पासिंग हातोडा
जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या पाथरगोटा आणि अंतरजी येथील शेतकऱ्यांच्या साग व बिजा या मौल्यवान प्रजातीच्या झाडांची कंत्राटदारामार्फत जून महिन्यामध्ये तोड करण्यात आली. एका ठिकाणी जमा केलेल्या या झाड्यांच्या २० ते २५ घनमीटर लाकडांच्या मालावर ११ आॅक्टोबरच्या रात्री सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास पासिंग हातोडा हॅम्बर वन विभागाच्या माध्यमातून मारण्यात आला. सदर वृक्षतोड अवैध असतानाही या संदर्भात चौकशी करण्यात आली नाही.
वन संवर्धन काळाची गरज आहे. वन कायदा हा एका बाजूने अवैध वृक्षतोडीला जबाबदार आहे. मात्र वनकायदा बाजूला सारून स्वार्थापोटी वनाधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने पाथरगोटा व अंतरजी परिसरातील शेतकऱ्यांच्या झाडांची तोड केली जात आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित ही बाब उजेडात आणली होती. मुख्य वनसंरक्षक गडचिरोली व उपवनसंरक्षक वडसा यांनी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड प्रकरणाची कसल्याही प्रकारची शहानिशा केली नाही. यावरून वनाधिकाऱ्यांचे अवैध वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शेतकऱ्याला स्वत:च्या शेतातील झाड तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. शिवाय या परवानगीकरिता अनेक कागदपत्रांची जुळवाजुळवही करावी लागते. मात्र कंत्रादाराने कोणतेही पुरावे जोडले नसतांनाही हजारो घनमीटरची लाकडे तोडून अवैध वाहतूक करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते आहे. पाथरगोटा व अंतरजी येथील अवैध वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)