शिक्षकांसह पालकांनी तंत्रस्नेही होणे आवश्यक
By Admin | Updated: March 6, 2016 00:57 IST2016-03-06T00:57:46+5:302016-03-06T00:57:46+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी डिजीटल शाळेची गरज आहे.

शिक्षकांसह पालकांनी तंत्रस्नेही होणे आवश्यक
संदीप गुंड यांचे प्रतिपादन : डिजीटल स्कूल प्रेरणा कार्यशाळा उत्साहात
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी डिजीटल शाळेची गरज आहे. तंत्रज्ञानातून शैक्षणिक अध्यापन व अध्ययनाची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्यासाठी शिक्षकांसह पालकांनी तंत्रस्नेही होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्यातील पास्टेवाडा जि. प. शाळेचे शिक्षक संदीप गुंड यांनी केले.
डायट गडचिरोली, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन, नावीण्यपूर्ण उपक्रम कक्ष, द यूथ समूह, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व तंत्रस्नेही मित्र गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी येथील गोंडवाना कलादालनात आयोजित डिजीटल प्रेरणा कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, डायटचे अधिव्याख्याता धनंजय चापले, वैद्य, ठाणे जिल्ह्यातील केंद्रप्रमुख महेंद्र भिमटे, जि. प. चे प्रभारी उपशिक्षणाधिकारी उकंडराव राऊत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संदीप गुंड म्हणाले, जि. प. शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्गात मानसिक उपस्थिती असणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांचे अध्यापन प्रभावी असणे गरजेचे आहे. अध्यापनादरम्यान ज्या शिक्षकाला विद्यार्थ्यांचे लक्ष खिळवून ठेवता येते. त्यालाच गुणवत्ता साध्य करता येते. विद्यार्थ्यांना स्क्रीन आवडत असल्यामुळे एलसीडी प्रोजेक्ट व टॅबद्वारे शिक्षकांनी वर्गात अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाबाबत आवड निर्माण होईल. खडू-फळ्याच्या वापरापेक्षा ई-लर्निंग प्रचंड प्रभावी माध्यम होते, असेही गुंड यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम डिजीटल शाळा म्हणून उदयास आलेल्या पास्टेवाडा जि. प. शाळेतील डिजीटल अध्यापन व अध्ययन पद्धतीची माहिती दिली. याशिवाय ई-लर्निंगमधील सॉप्टवेअर, अॅप्स व प्रोजेक्टरच्या विविध मॉडेलची सखोल माहिती दिली.
कार्यशाळेला जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आदींसह जवळपास २५० शिक्षक उपस्थित होते. यावेळी इतर मान्यवरांनीही ज्ञानरचनावाद, ई-लर्निंग व डिजीटल शैक्षणिक तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. संचालन सुधीर गोहणे यांनी केले तर आभार राकेश सोनटक्के यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राजेश दरेकर, गुलाब मने यांच्यासह जि. प. शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)