अहेरीच्या राजवाड्यासमोर पालक, विद्यार्थ्यांचा ठिय्या
By Admin | Updated: July 1, 2015 01:46 IST2015-07-01T01:46:51+5:302015-07-01T01:46:51+5:30
विद्यार्थी सहभागी : मॉडेल स्कूल बंद झाल्याच्या विरोधात आंदोलन

अहेरीच्या राजवाड्यासमोर पालक, विद्यार्थ्यांचा ठिय्या
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात पालक व विद्यार्थी संतप्त झाले असून सदर स्कूल बंद करू नये, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अहेरी येथील रूख्मीनी महल या राजवाड्यासमोर शेकडो पालक व विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळातही प्रचंड खळबळ उडाली आहे.
केंद्र सरकारच्या निधीतून राज्यात ४३ तर गडचिरोली या मागास जिल्ह्यात पाच मॉडेल स्कूल चालविल्या जात होत्या. यामध्ये आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, धानोरा (मोहली) यांचा समावेश होता. या शाळा २०१५-१६ या शैक्षणिक सत्रापासून बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे ४७५ विद्यार्थ्यांचे समायोजन इतरत्र केले जाणार आहे. आलापल्ली येथील मॉडेल स्कूलमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जात होते. या शाळेने मोठा लौकीक मिळविला होता. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ही शाळा आता बंद झाली आहे. ही शाळा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांच्या राजवाड्यावर व तहसील कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्यानंतरही शासनस्तरावरून काहीही निर्णय झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालक व विद्यार्थ्यांनी आज राजवाड्यासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र तेथे बसण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे राजमहल मार्गावर राजघाटासमोर ठिय्या आंदोलन मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे.
या आंदोलनात शेकडो पालक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला गडचिरोली जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार व आलापल्लीच्या जिल्हा परिषद सदस्य विजया विठ्ठलानी आदींनी उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शविला आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. (तालुका प्रतिनिधी)