लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या व्यवस्थापनाने अनावश्यक शुल्क वाढ केल्याचा आरोप करीत काही संतप्त पालकांनी शनिवारी शाळेसमोर हंगामा केला.पालकांनी १५ मार्च रोजी प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या संचालक मंडळाला निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, प्लॅटिनम ज्युबिली शाळेचे व्यवस्थापन शहरातील इतर शाळांच्या तुलनेत अवाढव्य शुल्क आकारत आहेत. टर्म फीज, लायब्ररी फीज, मटेरियल फीज, कल्चरल फीज, स्पोर्ट फीज, लेबॉरटरी फीज, अॅन्युअल मेंटनन्स फीज, अॅडमिशन फीज आदी प्रकारचे अवाजवी फीज घेऊन पालकांवर आर्थिक भूर्दंड लादला जात आहे. एवढे शुल्क जास्त होत असल्याने शाळा संचालक मंडळाने शुल्क कमी करावे, अशी मागणी निवेदनातून केली. निवेदनाची दखल घेत शाळेने पालकांची शनिवारी दुपारी ४ वाजता सभा आयोजित केली. या सभेत शुल्क कमी करण्याची मागणी पालकांनी केली. मात्र १० टक्के शुल्क वाढ केल्याशिवाय शाळा चालविणे शक्य नसल्याचे सांगून १० टक्के शुल्क वाढ केलीच जाईल, अशी माहिती प्राचार्य रहिम अमलानी यांनी सभेदरम्यान पालकांना दिली. त्यामुळे पालक आणखी संतप्त झाले. शाळेतून बाहेर निघतेवेळी काही संतप्त पालकांनी शाळेवर दगडफेक सुध्दा केली. शिक्षण शुल्कात कपात न केल्यास शाळेतील विद्यार्थ्यांची टीसी काढली जाईल, असा इशारा दिला.शिक्षण विभागाच्या नियमानुसार प्रत्येक शाळेत पालक शिक्षक समिती स्थापन करणे आवश्यक असतानाही या शाळेत पालक शिक्षक समितीच गठीत करण्यात आली नाही. पालकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्राचार्यांनी पालक शिक्षक समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले. गणवेश, पुस्तके सुध्दा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप केला आहे.शाळेतर्फे कोणतेही अनावश्यक शुल्क आकारले जात नाही. संस्थेला शासनाकडून अनुदान मिळत नाही. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नियमानुसार शुल्क वाढ केली जात आहे. नियमानुसार करण्यात येत असलेल्या शुल्कवाढीला पालकांचा विरोध असून काही काही संस्था पालकांना भडकावत आहेत. केवळ शाळेला बदनाम करण्याचा हा षडयंत्र रचला जात आहे.- रहिम अमलानी, प्राचार्य,प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल गडचिरोली
प्लॅटिनम ज्युबिली शाळेविरोधात पालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:58 IST
गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या व्यवस्थापनाने अनावश्यक शुल्क वाढ केल्याचा आरोप करीत काही संतप्त पालकांनी शनिवारी शाळेसमोर हंगामा केला.
प्लॅटिनम ज्युबिली शाळेविरोधात पालकांचे आंदोलन
ठळक मुद्देअनावश्यक शुल्कवाढ केल्याचा आरोप : सामूहिक टीसी काढण्याचा इशारा; शाळेत पार पडली सभा