भरमसाठ शुल्काने पालक हैराण
By Admin | Updated: April 9, 2015 01:25 IST2015-04-09T01:25:48+5:302015-04-09T01:25:48+5:30
इंग्रजी माध्यमांच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या कॉन्व्हेंटच्या अवाजवी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने शुल्क धोरण जाहीर केले.

भरमसाठ शुल्काने पालक हैराण
देसाईगंज : इंग्रजी माध्यमांच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या कॉन्व्हेंटच्या अवाजवी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने शुल्क धोरण जाहीर केले. मात्र या शुल्क धोरणाला जिल्हाभरातील कॉन्व्हेंटनी धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारात असल्याचे चित्र आहे. देसाईगंज शहरातील साऱ्याच इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याने तालुक्यातील सर्वसामान्य पालकांचे कंबरडे मोडले आहे.
देसाईगंज शहरातील व तालुक्याच्या मोठ्या गावातील इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये नर्सरी वर्गाच्या प्रवेशासाठी सहा हजार रूपयांपर्यंत पालकांकडून शुल्क घेतले जात आहे. आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेणे कठीण झाले आहे. दरवर्षी साधारणत: परीक्षेचा काळ असलेल्या एप्रिल महिन्यात कॉन्व्हेंटची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश झालेल्या वर्गाची परीक्षा झाल्यानंतर पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी शुल्क आकारून विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित केला जातो. सदर प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी प्रत्येक कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश शुल्क समिती गठित केली जाते. मात्र या समितीमध्ये कॉन्व्हेंट चालविणाऱ्या संस्थांकडून आपल्या मर्जीतील लोकांचा भरणा केला जात असल्याने मोठ्या प्रमाणात शुल्क आकारल्या जाते. कॉन्व्हेंटला अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने गठित करण्यात आलेली शुल्क नियंत्रण समितीही संस्थेला सहकार्य करीत असते.
नर्सरी वर्गाच्या प्रवेशासाठी सहा हजार रूपये शुल्क भरून पालकांना गणवेश व पाठ्यपुस्तके आपल्या स्तरावरून खरेदी करावे लागतात. त्यामुळे नर्सरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च १५ हजाराच्या आसपास जातो. नर्सरीपुढील प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. देसाईगंज शहरात कॉन्व्हेंटमध्ये पाचव्या वर्गाच्या विद्यार्थी प्रवेशासाठी आठ ते दहा हजार रूपयांचे शुल्क आकारले जात आहे. पाठ्यपुस्तकांसाठी दीड हजार व गणवेशासाठी दोन हजार रूपयांचा खर्च पालकांना करावा लागतो. याशिवाय वाहतूक खर्च व कान्व्हेंटचे मासिक शुल्क नियमित अदा करावे लागते. इतर उपक्रमांसाठीही अनेकदा ५० ते १०० रूपये कॉन्व्हेंटला द्यावे लागतात. (वार्ताहर)