बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत
By Admin | Updated: March 1, 2017 01:41 IST2017-03-01T01:41:27+5:302017-03-01T01:41:27+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी १२ वीची परीक्षा २८ फेब्रुवारी मंगळवारपासून सुरू झाली आहे.

बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत
४३ केंद्रांवरून परीक्षा : परिसरात चोख पोलीस बंदोबस्त; भरारी पथकाची कॉपीबहाद्दर परीक्षार्थ्यांवर नजर
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी १२ वीची परीक्षा २८ फेब्रुवारी मंगळवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी मंगळवारला इंग्रजी विषयाचा पेपर सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत पार पडला. जिल्हाभरातील एकूण ४३ केंद्रांवरून जवळपास १४ हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला. पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर जिल्हाभरात शांततेत पार पडला.
यावर्षी इयत्ता १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यभरासह गडचिरोली जिल्ह्यातही परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी गडचिरोली तालुक्यात ६, आरमोरी तालुक्यात ६, देसाईगंज ५, कुरखेडा ५, कोरची २, धानोरा २, चामोर्शी ६, मुलचेरा २, अहेरी ३, एटापल्ली २, भामरागड १ व सिरोंचा तालुक्यात ३ केंद्र ठेवण्यात आले आहेत. यंदा जिल्हाभरात जुने व नवीन परीक्षार्थी मिळून एकूण १४ हजार ३८६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सदर परीक्षा अत्यंत निकोप व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी या अनुषंगाने सहा भरारी पथक गठित करण्यात आले आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह उपशिक्षणाधिकारी व डायटच्या महिला पथकाचा समावेश आहे.
चामोर्शी शहरातील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे. या ६१४ क्रमांकाच्या केंद्रावर एकूण ५३९ परीक्षार्थी १२ वीची परीक्षा देत आहे. या ठिकाणी केंद्रप्रमुख म्हणून प्राचार्य वाय. आर. मेश्राम, सहायक केंद्रप्रमुख म्हणून एस. एफ. घागरे काम पाहत आहेत. जा. कृ. बोमनवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या ६१५ क्रमांकाच्या परीक्षा केंद्रावर एकूण ५०४ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या ठिकाणी केंद्रप्रमुख म्हणून एन. डब्ल्यू. कापगते तर सहायक केंद्रप्रमुख म्हणून एच. जी. तागडे काम पाहत आहेत. मंगळवारी चामोर्शी शहरात दोन केंद्र मिळून एकूण १ हजार ४३ विद्यार्थ्यांनी १२ वीचा इंग्रजी विषयाचा पेपर सोडविला.
अहेरी येथील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाच्या केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात १२ वीची परीक्षा सुरू झाली आहे.
सिरोंचा शहरातील दोन केंद्रावर पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला ५६२ विद्यार्थी उपस्थित होते. येथील जिल्हा परिषद हायस्कूल व भगवंतराव कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अशा दोन केंद्रांवर शांततेत परीक्षा सुरू आहे. जि. प. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर ३२५ विद्यार्थी परीक्षा देत असून यात दोन दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या केंद्राचे संचालक म्हणून एन. आर. मरस्कोल्हे, अतिरिक्त केंद्र संचालक म्हणून एन. जी. देवगडे काम पाहत आहेत. भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर एकूण २३७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.