धान गंजीवर मोकाट जनावरांचा डल्ला
By Admin | Updated: December 16, 2015 01:46 IST2015-12-16T01:46:34+5:302015-12-16T01:46:34+5:30
परिसरात भाकड जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पशुपालकांना या जनावरांपासून कुठल्याही प्रकारचे काम करून घेता येत नाही.

धान गंजीवर मोकाट जनावरांचा डल्ला
वैरागड परिसरात धुमाकूळ : पशुपालकांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकरी हैराण
वैरागड : परिसरात भाकड जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पशुपालकांना या जनावरांपासून कुठल्याही प्रकारचे काम करून घेता येत नाही. तसेच त्यांच्यापासून आर्थिक लाभही मिळत नाही. परिणामी पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडतात अथवा गुरांच्या कळपात सोडतात. मात्र कळपातून अंग काढून अनेक जनावरे हिरव्या दिसणाऱ्या चाऱ्याच्या शोधात शेत गाठून रबी पिकाची नासधूस करतात. सदर नित्यक्रम वैरागड परिसरात नेहमीच सुरू आहे. परंतु आता मोकाट जनावरांकडून धान गंजीचीही नासधूस करण्याचा सपाटा सुरू आहे. या मोकट जनावरांमुळे वैरागड परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत.
काही पशुपालक धानपीक निघल्याबरोबर जनावरे मोकाट सोडून देत आहेत. ही जनावरे धानाचे पुंजणे खाण्याबरोबरच रबी पिकांचेही नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
वैरागड परिसरात धानाच्या कापणीनंतर बांधीत रबी पिकाचेही उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी शेत नांगरून उडीद, मूग, हरभरा, लाखोळी आदी पिकांची पेरणी केली आहे. त्याचबरोबर बांधीच्या पाऱ्यावर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. काही पशुपालकांची क्षमता नसतानाही अधिकचे जनावरे पाळत आहेत. ही जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून दिली जात आहेत. या जनावरांकडून रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.
शेतकऱ्यांना दिवस-रात्र पहारा देऊन पिकाची राखण करावी लागत आहे. अनेक शेतकरी मोकाट जनावरांमुळे त्रस्त होऊन रबी पिकांची पेरणी करीत नाही. मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकल्यास ग्राम पंचायत प्रती गुरामागे २५० रूपये दंड आकारते. मात्र या २५० रूपयांपैकी २०० रूपये सहा महिन्यांनी परत मिळतात. त्यामुळे मोकाट पशुपालक सुद्धा या दंडाला जुमानत नसल्याची बाब अनेक शेतकरी बोलून दाखवित आहेत. शासनाने या दंडात दोन ते तीन पटीने वाढ करावी, अशी मागणी वैरागड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)