नियोजनाअभावी धानपीक धोक्यात
By Admin | Updated: October 26, 2015 01:32 IST2015-10-26T01:32:19+5:302015-10-26T01:32:19+5:30
कन्नमवार जलाशयाच्या प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन केले नसल्याने कळमगाव, सगणापूर, कान्होली, मुरखळा आदी ...

नियोजनाअभावी धानपीक धोक्यात
कळमगाव परिसरातील परिस्थिती : कन्नमवार जलाशय प्रशासनाचे दुर्लक्ष
चामोर्शी : कन्नमवार जलाशयाच्या प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन केले नसल्याने कळमगाव, सगणापूर, कान्होली, मुरखळा आदी गावांमधील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळत नसल्याने धानपीक करपायला लागले आहे.
या परिसरात कन्नमवार जलाशयाचे पाणी मिळते. सदर भाग टेलवर असल्याने शेवटपर्यंतच्या शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. एकराप्रमाणे पाणी देण्याचे दिवस ठरवून शेवटपर्यंत पाणी जाईल, यासाठी वेळापत्रक ठरविणे गरजेचे आहे. मात्र सिंचाई विभागाचे अधिकारी या क्षेत्रात येऊनही बघत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्य कालव्याजवळ असलेले शेतकरी रात्रंदिवस मोरी सुरू ठेवून पाणी देत आहेत. मात्र शेवटपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांमध्ये आपापसामध्ये भांडण, तंटे सुरू झाले आहेत. रात्रभर जागूनही पाणी मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. याबाबत सिंचाई विभागाकडे अनेकवेळा शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)