गोदाम भरल्याने आरमोरीत धान खरेदी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST2021-02-20T05:42:39+5:302021-02-20T05:42:39+5:30
आरमोरी : गेल्या तीन महिन्यांपासून नियमित सुरू असलेले मार्केटिंग फेडरेशनचे आधारभूत धान खरेदी केंद्र आता गोदाम भरल्याने व पुढील ...

गोदाम भरल्याने आरमोरीत धान खरेदी ठप्प
आरमोरी : गेल्या तीन महिन्यांपासून नियमित सुरू असलेले मार्केटिंग फेडरेशनचे आधारभूत धान खरेदी केंद्र आता गोदाम भरल्याने व पुढील खरेदीसाठी गोदामाची व्यवस्था न झाल्याने १७ फेब्रुवारीपासून खरेदीसाठी बंद करण्यात आले. गोदामांची लवकर व्यवस्था करून धान खरेदी पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आरमोरी तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी हे गेल्या तीन महिन्यांपासून खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी टोकनद्वारे आपापले नंबर लावून वाट पाहात होते. जवळपास तीन ते चार गोदाम हे धान खरेदीने पूर्णतः फुल्ल झाली असल्याने अजून अर्धे अधिक शेतकरी हे धान विक्रीपासून वंचित आहेत. आरमोरी तालुक्यात धानाची खरेदी करण्यासाठी खरेदी विक्री समितीकडे स्वतःचे गोदाम नसल्याने तसेच शासकीय गोदाम उपलब्ध न झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी आलेले जवळपास ३० ट्रॅक्टर धान उघड्यावर ठेवलेले आहे.
गुरुवारी जवळपास तीन वाजल्यापासून आरमोरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला. ज्या-ज्या शेतकऱ्यांचे धान बाजार समितीच्या आवारामध्ये आणलेले आहेत, त्या शेतकऱ्यांचे धान पावसामुळे भिजून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाची नासाडी होणार आहे. प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याच्या दृष्टीने आरमोरी परिसरात धान खरेदी व साठवणुकीसाठी गोदामांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देताना ईश्वर नरूले, पटवारी दोनाडकर, धनराज दोनाडकार, श्रीरंग धकाते, अरुण विश्वास, सुनील मंडल, प्रकाश माझी, ज्ञानेश्वर कुथे, नंदकिशोर दोनाडकर, सुनील लोणारकर, विलास मडावी, ज्योती दोनाडकर, साधुजी राऊत, प्रल्हाद मिसाळ, सरस्वती ठाकरे, रामभाऊ दुपारे, अतिश उपरीकर लक्ष्मण वाघडे आदी शेतकरी उपस्थित होते.
धान गोदाम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरमोरी खरेदी - विक्री समितीचे अध्यक्ष महेंद्र मने यांना विचारणा केली असता आमच्याजवळ गोदाम उपलब्ध नसल्याने उघड्यावर धान खरेदी करू शकत नाही. गोदामांची व्यवस्था झाल्याबरोबर धान खरेदीला सुरुवात करू, यासाठी शासनाकडून आम्हाला गोदामांची व्यवस्था करून देण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आहे.