एक लाख क्विंटलने धान खरेदी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:12 IST2016-04-25T01:12:18+5:302016-04-25T01:12:18+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत जिल्ह्यात दरवर्षी धान खरेदी केली जाते.

एक लाख क्विंटलने धान खरेदी घटली
दुष्काळाचा परिणाम : महामंडळ व संस्थांना फटका
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत जिल्ह्यात दरवर्षी धान खरेदी केली जाते. सन २०१४-१५ वर्षाच्या खरीप हंगामाच्या तुलनेत सन २०१५-१६ या वर्षाच्या खरीप हंगामात दुष्काळामुळे तब्बल एक लाख क्विंटलने धान खरेदी घटली. याचा फटका महामंडळ व सहकारी संस्थांना बसला.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत गतवर्षी सन २०१४-१५ च्या खरीप हंगामात एकूण ५० धान खरेदी केंद्रावरून ४५ कोटी ३६ लाख ९६ हजार ६५० रूपये किमतीचे एकूण ३ लाख ३३ हजार ३७९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. तर यंदा २०१५-१६ या खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत ३२ कोटी ९५ लाख ५३ हजार ३०७ रूपये किमतीच्या एकूण २ लाख ३३ हजार ७२५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात २०१५-१६ वर्षाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आपली शेतजमीन पडीक ठेवावी लागली. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आपल्या शेत जमिनीला पाणी पुरवठा करून कशीबशी धानाची रोवणी केली. मात्र त्यानंतरही पावसाने दगा दिल्याने धानाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे यावर्षी महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर सुरूवातीपासूनच धानाची दरवर्षीप्रमाणे आवक दिसून येत नव्हती. महामंडळाच्या वतीने आधारभूत किमत खरेदी योजनेचा खरीप हंगाम ३१ मार्च २०१६ रोजी संपुष्टात आणण्यात आला. या हंगामात ४१ केंद्रांवरून २ लाख ३३ हजार ७२५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यावर्षी धान खरेदी घटल्यामुळे आदिवासी विविध सहकारी संस्थांचा नफा कमी झाला.