सहा महिन्यांत पावणेतीन लाख क्विंटल धान खरेदी
By Admin | Updated: May 4, 2015 01:32 IST2015-05-04T01:32:55+5:302015-05-04T01:32:55+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थामार्फत

सहा महिन्यांत पावणेतीन लाख क्विंटल धान खरेदी
दिलीप दहेलकर गडचिरोली
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थामार्फत आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत २०१४-१५ च्या हंगामात नोव्हेंबर २०१४ ते १ मे २०१५ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ५५ केंद्रामार्फत तीन लाख ३३ हजार ७८३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या मालकीचे गोदाम नसल्याने खरेदी करण्यात आलेले लाखो क्विंटल धान अद्यापही उघड्यावर असल्याची बाबही उघडकीस आली आहे.
आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण तीन लाख ३३ हजार ७८३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यापैकी शेतकऱ्यांना ८७ कोटी ८९ लाख ७६ हजार ७१६ रूपयांचे चुकारे अदा करण्यात आले. मात्र महामंडळाला शासनाकडून पुरेसा निधी न मिळाल्यामुळे अद्यापही ५५ हजार १२४ रूपयांचे शेतकऱ्यांच्या धान विक्रीचे चुकारे प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
खासगी व्यापाऱ्यांचा महामंडळाला फटका
जिल्ह्यात अनेक खासगी व्यापारी नगदी चुकारे देऊन व शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवून त्यांच्याकडून लाखो रूपयांचे धान खरेदी करीत आहे. ग्रामीण भागात थेट वाहन नेऊन अनेक व्यापारी धान खरेदी करीत आहेत. याचा फटका महामंडळाला बसत आहे. महामंडळाचे गडचिरोली प्रादेशिक कार्यालय सहकारी संस्थामार्फत वर्षभरात तीन ते साडेतीन हजार लाख क्विंटल धान खरेदी होणे आवश्यक आहे. मात्र सहा महिन्यांच्या कालावधीत खासगी व्यापाऱ्यांच्या सुळसुळाटामुळे महामंडळाने फारच कमी धान खरेदी केली आहे. यामुळे महामंडळाचे वर्षभरातील धान खरेदीचे उद्दीष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.