धान उघड्यावरच!

By Admin | Updated: May 31, 2015 01:15 IST2015-05-31T01:15:01+5:302015-05-31T01:15:01+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी सुमारे २ लाख ५ हजार १५० क्विंटल धानाची अजूनही उचल करण्यात आलेली नाही.

Paddy in the open! | धान उघड्यावरच!

धान उघड्यावरच!

दोन लाख क्विंटल : उचल करण्यास मिलमालक अनुत्सूक
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी सुमारे २ लाख ५ हजार १५० क्विंटल धानाची अजूनही उचल करण्यात आलेली नाही. सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आलेला आहे. आठ दिवसानंतर पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने सदर धान भिजून कोट्यवधी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फतीने धानाची खरेदी करते. २०१५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात ८४ धान खरेदी केंद्र स्थापन करण्यात आले होते. या धान खरेदी केंद्रांच्या मार्फत ५ लाख ४ हजार १९९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदी केल्यानंतर सदर धान भरडाईसाठी उचल करण्याची जबाबदारी शासनाची आहे. भरडाई करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ३० राईसमिलधारकांची नेमणूक करण्यात आली आहे.
पावसात भिजून नुकसानीची शक्यता
गडचिरोली : धान खरेदी केल्यानंतर पावसामुळे ते भिजू नये, यासाठी त्याची तत्काळ उचल करणे गरजेचे आहे. मात्र धान खरेदी करून पाच महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अजूनपर्यंत धानाची उचल करण्यात आली नाही. गडचिरोली प्रादेशिक विभागांतर्गत सुमारे १ लाख ३९ हजार ७६१ क्विंटल धान ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे. तर अहेरी प्रादेशिक विभागातील ६५ हजार ३८९ क्विंटल धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे.
पावसाळा केवळ आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मान्सूनचे आगमन कधीही होऊ शकते. त्यामुळ सदर धान भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश धान खरेदी केंद्र दुर्गम भागामध्ये आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल करणे अशक्य होणार आहे. परिणामी सदर धान संपूर्ण पावसाळाभर धान खरेदी केंद्रावरच उघड्यावर ठेवावे लागणार आहे. संपूर्ण पावसाळ्याचे पाणी धानावर गेल्यास सदर धान खराब होऊन शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होणार आहे.
याबाबत आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शासनाला वेळोवेळी पत्र पाठवून धानाची उचल करण्याची मागणी केली. मात्र अजूनपर्यंत धान उचलण्यात आले नाही. त्यामुळे धान सडण्याचा धोका यावर्षीही निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Paddy in the open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.