शेकडो हेक्टरवरील धान करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 01:29 IST2017-05-15T01:29:43+5:302017-05-15T01:29:43+5:30

धान पीक निसवले असतानाच खोडकिड्याचे आक्रमक झाल्याने धानपीक करपायला सुरूवात झाली आहे.

Paddy kale on hundreds of hectares | शेकडो हेक्टरवरील धान करपला

शेकडो हेक्टरवरील धान करपला

खोडकिडा व भारनियमनाचा परिणाम : देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा तालुक्यातील शेतकरी हवालदिल
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : धान पीक निसवले असतानाच खोडकिड्याचे आक्रमक झाल्याने धानपीक करपायला सुरूवात झाली आहे. यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
इटीयाडोह धरणाच्या माध्यमातून देसाईगंज व आरमोरी तालुक्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. मागील वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे इटीयाडोह धरणात सर्वसाधारण चांगला जलसाठा होता. त्यामुळे देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. आजपर्यंत धानाचे पीक चांगले जोमात आले होते. सद्य:स्थितीत धानाला लोंब आले आहेत. अशा स्थितीत धानावर खोडकिड्याने प्रादुर्भाव केला आहे. खोडकिडाही रस शोषणारी अळी असल्याने धानाचे पीक करपण्यास सुरूवात झाली आहे. धान निसवण्याच्या मार्गावर असतापासूनचा खोडकिड्याने आक्रमण केले आहे. धान निसवले तरीही खोडकिड्याचा प्रादुर्भाव कायम आहे. हातात आलेले पीक जाऊ नये यासाठी शेतकरी वर्गाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महागड्या किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. तरीही रोग आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नाही. खोडकिड्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे किटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचे हजारो रूपये खर्च होत आहेत. खोडकिडा लागल्यामुळे धानाचे लोंब न भरताच बाहेर पडत आहेत. या धानामध्ये तांदूळच राहत नसल्याने सदर लोंब बेकामी ठरणार आहे. आजपर्यंत हिरवेगार दिसणारे पीक ऐन वेळेवर करपण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळी धानाच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशातून खरीप हंगामाचा खर्च भागविला जातो. मात्र उत्पादनातच कमालीची घट होणार असल्याने खरीप हंगामाच्या खर्चासाठी शेतकऱ्याला सावकाराच्या दारात उभे होण्याची वेळ आली आहे. जवळपास ५०० हेक्टरवर खोडकिड्याचा प्रादुर्भाव आहे.

उन्हाळी धानाच्या उत्पादनात ६० टक्के घट होण्याची शक्यता
खोडकिड्यामुळे उन्हाळी धानाच्या उत्पादनात किमान ६० टक्के घट होण्याची भिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फतीने व्यक्त केली जात आहे. देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, कोकडी, फरी, कुरूड, कोंढाळा, तुळशी, पोटगाव, शंकरपूर, कोरेगाव, चोप, बोडधा, एकलपूर टोला, सावंगी या भागातील धान पिकावर खोडकिड्याने प्रादुर्भाव केला आहे. आरमोरी तालुक्यातीलही काही गावांमधील उन्हाळी धान पिकाला खोडकिड्याचा फटका बसला आहे. यावर्षी पहिल्यांदाच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली. मात्र ऐन वेळेवर धान पीक करपत चालले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची नितांत आवश्यकता आहे.

 

Web Title: Paddy kale on hundreds of hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.