पाण्याअभावी धानपीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:03 IST2018-02-28T01:03:52+5:302018-02-28T01:03:52+5:30

पाण्याअभावी धानपीक धोक्यात
ऑनलाईन लोकमत
मानापूर/देलनवाडी : मानापूर, देलनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपीकाची लागवड करण्यात आली आहे. या परिसरातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने धानपीक धोक्यात आले आहे.
नदी काठावरील बहुतांश शेतकरी उन्हाळी धानपीकाचे उत्पादन घेतात. या पिकाला नदीपात्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मानापूर, देलनवाडी परिसरात शेकडो हेक्टरवर धानपीक लावण्यात आले आहे. धानपिकाच्या रोवणीचे काम पूर्ण झाले असून हिरवेकंच धानपीक डोलायला लागले आहे. मात्र अशातच खोब्रागडी नदीचे पात्र पूर्णपणे आटले आहे. काही शेतकऱ्यांनी नदीपात्रात खड्डा खोदून खड्ड्यातील पाणी धानपिकाला मोटारच्या सहाय्याने देण्यास सुरुवात केली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यातच नदीपात्र कोरडे पडले आहे. नदीच्या भूगर्भातील पाण्याची पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. धानपीक निघण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
उन्हाळ्यात कडक ऊन पडत असल्याने धानपिकाला अधिक पाणी द्यावे लागते. धानाच्या रोवणीवर काही शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च केले आहेत. मात्र पाण्याअभावी सदर धानपीक करपण्याचा धोका आहे. शासनाने खोब्रागडी नदीच्या पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी नदीपात्रात लहान बंधारे बांधावे, अशी मागणी आहे.