जंगली डुकरांमुळे धानपीक उद्ध्वस्त
By Admin | Updated: November 14, 2015 01:29 IST2015-11-14T01:29:31+5:302015-11-14T01:29:31+5:30
तालुक्यातील चेरपल्ली येथे जंगली डुकरांनी हैदोस घातला असून कापणीसाठी तयार झालेले पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे.

जंगली डुकरांमुळे धानपीक उद्ध्वस्त
चेरपल्लीतील शेतकरी त्रस्त : वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी
अहेरी : तालुक्यातील चेरपल्ली येथे जंगली डुकरांनी हैदोस घातला असून कापणीसाठी तयार झालेले पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे.
चेरपल्ली गावातील संपूर्ण शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे जंगलातील डुकरे धानपिकात शिरून नासाडी करीत आहेत. रानडुकरांचा कळप धान शेतीमध्ये शिरत असल्याने एकाच दिवशी चार ते पाच हेक्टरवरील शेताचे नुकसान होत आहे. चेरपल्ली येथील किशोर मल्लीय्या सुनतकर यांनी तीन एकर जमिनीत धानपिकाची लागवड केली. यावर्षी पाण्याची कमतरता असतानाही विहिरीने दररोज पाणी देऊन पिकाची निगा राखली. धानपिकाला लोंब लागले असून कापणीसाठी तयार झाले आहे. तीन दिवसांपूर्वी डुकरांचे कळप शेतामध्ये शिरून धानपिकाची नासधूस केली. दुष्काळी परिस्थितीतूनही सुनतकर यांनी धानपीक वाचविले.
हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. सुनतकर यांच्यासोबतच इतरही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. सुनतकर यांनी याबाबतची तक्रार वनपरिक्षेत्र कार्यालय अहेरी येथे केली आहे. चेरपल्ली पिकाचे वनरक्षक आनकरी यांनी पिकाची पाहणी केली व वरिष्ठांकडे ही घटना कळविले आहे. वन विभागाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)