लसीकरणाची कासवगती; राेजची गरज आठ हजारांची, मिळतात मात्र दाेन हजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST2021-05-10T05:00:00+5:302021-05-10T05:00:28+5:30
काेराेना लसबाबत नागरिकांमध्ये आता बऱ्यापैकी जागृती झाली असल्याने नागरिक लस घेण्यासाठी तयार हाेत आहेत. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर लसीकरणाची मागणी हाेत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे लसीकरण व्हावे, या उद्देशाने गडचिराेली आराेग्य विभागाने जिल्हाभरातील प्राथमिक आराेग्य केंद्र व एखाद्या माेठ्या उपकेंद्रांवरही लसीकरण केंद्र सुरू केले आहे. पूर्ण क्षमतेनिशी लस द्यायची झाल्यास दर दिवशी किमान आठ हजार लसची गरज आहे.

लसीकरणाची कासवगती; राेजची गरज आठ हजारांची, मिळतात मात्र दाेन हजार!
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लससाठी आराेग्य विभागाने एकूण ७५ केंद्रे तयार केली आहेत. प्रत्येक केंद्रावर दरदिवशी १०० लसचे उद्दिष्ट ठेवले तरी दरदिवशी ७ हजार ५०० लसची गरज आहे. मात्र, शासनाकडून कमी प्रमाणात लसचा पुरवठा केला जात असल्याने दरदिवशी जवळपास दाेन हजार नागरिकांनाच लस दिली जात आहे.
काेराेना लसबाबत नागरिकांमध्ये आता बऱ्यापैकी जागृती झाली असल्याने नागरिक लस घेण्यासाठी तयार हाेत आहेत. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर लसीकरणाची मागणी हाेत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे लसीकरण व्हावे, या उद्देशाने गडचिराेली आराेग्य विभागाने जिल्हाभरातील प्राथमिक आराेग्य केंद्र व एखाद्या माेठ्या उपकेंद्रांवरही लसीकरण केंद्र सुरू केले आहे. पूर्ण क्षमतेनिशी लस द्यायची झाल्यास दर दिवशी किमान आठ हजार लसची गरज आहे. मात्र, शासनाकडून लसचा पुरवठा कमी प्रमाणात हाेत असल्याने काही केंद्रांवर लस उपलब्ध नाही तर काही केंद्रांवर कमी प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी लागत आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात लसीकरणाला अजूनही गती आली नसल्याचे दिसून येत आहे.
१८ वर्षे वयाेगटावरील नागरिकांसाठी प्रामुख्याने शहरी भागातच लसीकरण केंद्र आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक लसपासून वंचित आहेत. लसच्या उपलब्धतेप्रमाणे प्रत्येक केंद्रावर २० ते २५ लस उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील युवकांचेही लसीकरण हाेईल.
१८ वर्ष वयाेगटांचा प्रचंड प्रतिसाद
१ मे पासून १८ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात युवकांकडून माेठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आराेग्य विभागाकडून शेड्यूल्ड टाकल्यानंतर काही मिनिटांतच पूर्णपणे बुक हाेत आहेत. युवकांचा प्रतिसाद लक्षात घेतला तर एकट्या गडचिराेली शहरात एकाच दिवशी दाेन ते तीन हजार लस देणे शक्य आहे. मात्र, प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १०० ते २०० च्या दरम्यान लसचे शेड्युल्ड टाकले जात आहे.
केंद्रावर सकाळी उसळते गर्दी
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे दुपारी लस घेण्यापेक्षा सकाळी ९ ते ११ वाजताची वेळ सर्वाधिक नागरिकांकडून निवडली जात असल्याने या वेळेवर लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळते. दुपारी १ वाजतानंतर मात्र गर्दी राहत नाही. एका बाॅटलमधील औषधीने १० जणांना लस दिली जाते. १० जण गाेळा हाेतपर्यंत बाॅटल फाेडली जात नाही. त्यामुळे १० जण गाेळा हाेतपर्यंत नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. गडचिराेली शहरात लसीकरणाला युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
युवकांकडून लस घेण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अनेक युवक लस घेण्यास तयार आहेत. मात्र शेड्युल्ड बुक राहत असल्याने लस मिळत नाही. ४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लसची अधिक गरज असताना ते घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे युवकांना दिल्या जाणाऱ्या लसचे प्रमाण वाढवावे.
- आकाश राजुरकर
आम्ही पहिला डाेज काेवॅक्सिनचा घेतला हाेता. आता मात्र अनेक केंद्रांवर ही लस उपलब्ध नाही. लस घेतल्याला आता ४५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, आता ही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. आराेग्य विभागाने काेवॅक्सिन ही लससुद्धा उपलब्ध करून द्यावी. माझ्यासारखे अनेक ज्येष्ठ नागरिक काेवॅक्सिन लसची प्रतीक्षा करीत आहेत.
- रामदास लाेणारे