बँकेने विकासाची गती वाढेल
By Admin | Updated: March 7, 2016 01:02 IST2016-03-07T01:02:51+5:302016-03-07T01:02:51+5:30
शासनाच्या विकासाच्या योजना गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या नागरिकांपर्यंत बँक पोहोचली असणे अत्यंत गरजेचे आहे.

बँकेने विकासाची गती वाढेल
अम्ब्रीशराव आत्राम : रेगुंठा शाखा व सिरोंचा बँक इमारतीचे उद्घाटन
सिरोंचा : शासनाच्या विकासाच्या योजना गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या नागरिकांपर्यंत बँक पोहोचली असणे अत्यंत गरजेचे आहे. बँकेमुळे आर्थिक व्यवहार गतिमान होण्यास मदत होऊन विकासाची गती वाढेल, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तालुक्यातील रेगुंठा येथे शाखा सुरू करण्यात आली. त्याचबरोबर सिरोंचा येथील बँक इमारतीचे उद्घाटन असा दुहेरी कार्यक्रम स्थानिक क्रीडा संकुलाच्या सभागृहात रविवारी पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, सिरोंचाचे नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरगेलवार, तालुकाध्यक्ष कलाम हुसेन, नाविस नेते बापू रंगूवार, रामभाऊ कोमेरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी बँकेच्या आर्थिक व्यवहाराचा आढावा सादर केला.
पुढे मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आर्थिक उलाढाल कमी असल्याने राष्ट्रीयकृत बँका आपल्या शाखा उघडण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सिरोंचा येथे स्वत:ची इमारत बांधली. त्याचबरोबर रेगुंठासारख्या दुर्गम गावात स्वत:ची शाखा स्थापन केली आहे. ही बाब जिल्हावासीय व बँक प्रशासनासाठी अतिशय लौकिकाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन व्यवस्थापक अरूण निंबेकर तर आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी व अधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)