नागरिक टेबलासभोवताल मात्र कर्मचारी कार्यालयाबाहेर
By Admin | Updated: December 16, 2014 22:54 IST2014-12-16T22:54:08+5:302014-12-16T22:54:08+5:30
थंडीला सुरूवात झाल्यापासून दुपारी ११ वाजेपर्यंत कर्मचारी उन्ह शेकत कार्यालयाबाहेर राहतात. तर कोसो दुरावरून शासकीय कामासाठी आलेले नागरिक टेबलासभोवताल गोळा होऊन अधिकारी व

नागरिक टेबलासभोवताल मात्र कर्मचारी कार्यालयाबाहेर
गडचिरोली : थंडीला सुरूवात झाल्यापासून दुपारी ११ वाजेपर्यंत कर्मचारी उन्ह शेकत कार्यालयाबाहेर राहतात. तर कोसो दुरावरून शासकीय कामासाठी आलेले नागरिक टेबलासभोवताल गोळा होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट बघत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरातील बहुतांश कार्यालयांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी थम्ब मशीन बसविण्यात आली आहे. या थम्ब मशीनवर कार्यालयाच्या वेळेप्रमाणे सकाळी १०.१० ते १०.३० या कालावधीत हजेरी लावणे गरजेचे आहे. अन्यथा सदर कर्मचाऱ्याची उशीरा आल्याची नोंद घेतली जाते. त्यामुळे वेतनात कपात होण्याची शक्यता असल्याने बहुतांश कर्मचारी १०.१० ते १०.३० या कालावधीत कार्यालयात येतात. हजेरी झाल्यानंतर मात्र लगेच बाहेर निघून उन्हात गप्पागोष्टी करीत असल्याचे चित्र बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये दिसून येते. अधिकारीवर्ग जवळपास १२ वाजेपर्यंत शासकीय कार्यालयात येत नाही. त्यामुळे तोपर्यंत कर्मचारी बिनधास्त असतात.
कामाच्या लगबगीने कोसो दुरावरून आलेले नागरिक शासकीय कार्यालयात १० वाजताच पोहोचतात. अधिकारी व कर्मचाऱ्याच्या टेबलासभोवताल बसून त्यांची वाट पाहत राहतात. अधिकारी १२ वाजेपर्यंत येत नाही. तर कर्मचारी हजेरी लावून पसार होतात. ११ वाजेपर्यंत टेबलासमोर नागरिकांची सभोवताल गर्दी जमली असल्याचे दिसून येते. मात्र साहेबाला बोलविण्याची हिंमत नागरिकांमध्ये नसल्याने आपसात कर्मचाऱ्यांच्या नावाने बोटे मोडीत उभे राहतात. काही कार्यालये तर पूर्णपणे ओस पडली असल्याचे चित्र बघावयास मिळते. साहेब व कर्मचारी नसले तरी त्यांच्या कार्यालयातील पंखे व लाईट मात्र सुरूच राहतात.
थम्ब मशीनवर हजेरी लावल्याने कर्मचारी कार्यालयात आला, हे सिद्ध झाले असले तरी त्याच्या येण्याबरोबरच कामसुद्धा होणे महत्वाचे आहे. कर्मचाऱ्यांच्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी समज देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)