शेत जमिनीची नियमबाह्य मोजणी
By Admin | Updated: March 19, 2015 01:31 IST2015-03-19T01:31:44+5:302015-03-19T01:31:44+5:30
तालुक्यातील मौजा पालोरा येथील तलाठी सज्जा क्रमांक ६ मधील सर्वे नं. १४८ च्या शेत जमिनीची सीमा कायम करण्यासाठी भूमी अभिलेख ..

शेत जमिनीची नियमबाह्य मोजणी
आरमोरी : तालुक्यातील मौजा पालोरा येथील तलाठी सज्जा क्रमांक ६ मधील सर्वे नं. १४८ च्या शेत जमिनीची सीमा कायम करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी लगतच्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नोटीस व पूर्व सूचना न देता जमिनीची मोजणी केली. अर्जदार शेतकऱ्याच्या बतावणीवरून त्याच्या वहिवाटीत नसलेली दुसऱ्या सर्वे नंबरची शेतीची जागा दाखवून कर्मचाऱ्यांनी मोजणीदरम्यान पाण्यासकट मामा तलावाची पाळ सरकवली, असा आरोप करीत लगतच्या शेतकऱ्यांनी पुनर्मोजणी करण्याची मागणी केली आहे.
सर्वे नं. १४८ ला लागून सर्वे नं. १४१ ही सरकारी गटाची जमीन आहे. या गटाची जमीन सर्वे नं. १४८ चे मालक धनराज बन्सोड यांना देण्यासाठी भूकरमापकाने सर्वे नं. १४४ च्या तलावाची पाळ ५० मीटर पुढे सरकवली, असा आरोप लगतचे शेतकरी तानाजी चिलबुले, नत्थू जिपकाटे, प्रल्हाद मेश्राम, शीला चिलबुले यांनी केला आहे.
सर्वे नं. १४१ मध्ये शेतकऱ्यांना वाटपाच्या जागा मिळाल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आपल्या सर्वे नंबरमधील जागेची २००४ व २०११ मध्ये भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून मोजणी केली होती. त्यावेळी यांची वहिवाट १४१ मध्ये असल्याचे निदर्शनास आले. या मोजणीदरम्यान धनराज बन्सोड हे स्वत: हजर होते, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. धनराज बन्सोड व शेषराव बन्सोड यांनी सर्वे नं. १४८ व १४९ हे दोन जमिनीचे गट खरेदी केले होते. २००१ च्या मोजणीत सर्वे नं. १४१ मधील शेतकऱ्यांची वहीवाट सर्वे नं. १४८ मध्ये नव्हती. सन २००१, २००४ व २०११ मध्ये करण्यात आलेल्या मोजणीत तलावाची पाळ कायम त्याच जागेवर दाखविण्यात आली होती. २० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरण व पाळीवर बांधकाम झालेले नाही. मात्र २३ फेब्रुवारी २०१५ च्या मोजणीदरम्यान भूकरमापक जाधव यांनी अर्जदाराच्या संगनमताने पाळीची जागा पुढे सरकवली. २३ फेब्रुवारीच्या जमीन मोजणीत आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचा आरोपही तानाजी चिलबुले, प्रल्हाद मेश्राम, नत्थू चिबकाटे, शीला चिलबुले यांनी करीत सदर मोजणी रद्द करून पुनर्मोजणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)