नक्षलवाद्यांना विरोध करून विकासाच्या प्रवाहात या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:59 IST2017-04-10T00:59:32+5:302017-04-10T00:59:32+5:30

मागील काही वर्षांपासून नक्षलवाद्यांनी दुर्गम भागातील अशिक्षित लोकांचा व झुडपी जंगलाचा आधार घेऊन

Opposition Naxalism is in the stream of development | नक्षलवाद्यांना विरोध करून विकासाच्या प्रवाहात या

नक्षलवाद्यांना विरोध करून विकासाच्या प्रवाहात या

अरविंद सोवनी यांचे आवाहन : नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यात छल्लेवाडा येथे भूमकाल संघटनेची धिक्कार सभा
रेपनपल्ली : मागील काही वर्षांपासून नक्षलवाद्यांनी दुर्गम भागातील अशिक्षित लोकांचा व झुडपी जंगलाचा आधार घेऊन आदिवासी नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायामुळे दुर्गम भागाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे नागरिकांनी नक्षलवाद्यांना विरोध करून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन भूमकाल संघटनेचे पदाधिकारी अरविंद सोवनी यांनी केले.
नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कमलापूरवरून चार किमी अंतरावरील छल्लेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भूमकाल संघटनेतर्फे धिक्कार सभा शनिवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर भूमकाल संघटनेचे अ‍ॅड. गोडाने, नागपूर विभागाचे बौध्द धम्म प्रचारक संघप्रीय गौतम , अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, प्रा. डॉ. श्रीकांत भोवते, प्रशांत विधे, रेपनपल्लीचे पोलीस निरिक्षक विठ्ठल दुरपडे, पोलीस उपनिरिक्षक ढोबले आदी मान्यवर उपस्थित होते. बौध्द धम्म प्रचारक संघप्रिय गौतम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर नागरीकांनी मार्गक्रमण करावे, असे सांगितले. डॉ. श्रीकांत भोवते म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर आम्ही चालतो, असे नक्षलवादी सांगतात. जर नक्षलवादी डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर चालले असते तर गतवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आमदार दीपक आत्राम यांच्या अंगरक्षकाची हत्या नक्षलवाद्यांनी केली नसती. नक्षलवादी आंबेडकरांच्या विचारावर चालत असतील तर ते बंदुकीचा आश्रय का घेतात, असा सवाल भोवते यांनी यावेळी उपस्थित केला. गावातील लोक नक्षलवाद्यांना अन्न, पाणी, निवारा आदी वस्तू देत असतात. मात्र नक्षलवादी लोकांना मदत करण्याऐवजी त्यांची हत्या करीत असतात. नक्षलवाद ही समस्या केवळ गडचिरोली जिल्ह्यात नसून भारतातील १३ राज्यात कायम आहे. नक्षलवादी लोकांना मदत करण्यासाठी काम करीत नसून लोकांना सरकारकडून मिळणाऱ्या सोयीसुविधापासून वंचित ठेवण्याचे काम करतात. छल्लेवाडा गावातील पाच दलित व्यक्तींची नक्षलवाद्यांनी हत्या केली, असे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सदर धिक्कार सभेला छल्लेवाडा परिसरातील गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

भविष्य अंधारात न ठेवण्याची केली सूचना
छल्लेवाडा या अतिदुर्गम भागात आजही पक्के रस्ते नाही. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा नाही. कच्चा रस्ता आहे पण त्यावर पूल नाही. याशिवाय अनेक समस्या कायम आहे. शासन व प्रशासन दुर्गम गावात सोयीसुविधा देऊन गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असते. मात्र विकासकामाला नक्षलवादी विरोध करीत असल्याने विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांना आधार देऊन आपले भविष्य अंधारात ठेवू नका. नक्षलवाद्यांना हाकलून लावून समाजाच्या मुख्य प्रवाहात या, अशी सूचना भूमकाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना केली.

Web Title: Opposition Naxalism is in the stream of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.