गडचिरोलीत विकासाला संधी
By Admin | Updated: December 13, 2015 01:29 IST2015-12-13T01:29:34+5:302015-12-13T01:29:34+5:30
गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक संपदा आणि खनिजांनी समृद्ध आहे. येथे नवीन उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. अनेक पर्यटनस्थळ तर जागतिक दर्जाची होऊ शकतात.

गडचिरोलीत विकासाला संधी
राजे अंबरीश आत्राम : पर्यटन क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज
नागपूर : गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक संपदा आणि खनिजांनी समृद्ध आहे. येथे नवीन उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. अनेक पर्यटनस्थळ तर जागतिक दर्जाची होऊ शकतात. नक्षलवादाची समस्यादेखील बरीच कमी झाली असून गडचिरोली जिल्ह्याबाबत नकारात्मक भाव दूर करण्याची गरज असल्याचे मत आदिवासी विकास राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अंबरीश आत्राम यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली व संपादकीय सहकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी उपस्थित होते.
एक काळ होता जेव्हा गडचिरोली जिल्ह्याच्या समस्येबाबत कुठेही चर्चा होत नव्हती. परंतु केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे नवी दिल्लीत जिल्ह्याच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद बराच कमी झाला आहे. येथे येणाऱ्या लोकांनी त्याची भीती बाळगायची गरज नाही. गडचिरोलीमध्ये निधी नव्हे तर अधिकाऱ्यांची कमतरता जाणवते. नक्षलवादाची समस्या विकासातून दूर होऊ शकते, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. गडचिरोली जिल्हा अजूनदेखील मागास आहे. त्यामुळे येथे मोठ्या कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. वनउत्पादनांनादेखील प्रोत्साहन देण्यासाठी चर्चा झाली आहे. गडचिरोलीमध्ये अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत. यांचा प्रसार करण्यात येणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यावर तसेच रेल्वे व रस्त्यांच्या विकासावर विशेष भर देण्याची गरज आहे, असे मत कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले तर जिल्ह्याच्या विकासासाठी विकास योजना तयार व्हावी व योग्य नियोजनातून विकासकार्यांची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा देवराव होळी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)