नर्सिंग शिक्षणातून सक्षम व स्वावलंबनाची संधी
By Admin | Updated: January 25, 2016 01:58 IST2016-01-25T01:58:05+5:302016-01-25T01:58:05+5:30
सुदृढ आरोग्यामुळेच सशक्त समाजाची निर्मिती होते. शिक्षणाची पुरेशी सोय नसलेल्या भागात आरोग्य क्षेत्रात काम

नर्सिंग शिक्षणातून सक्षम व स्वावलंबनाची संधी
गडचिरोली : सुदृढ आरोग्यामुळेच सशक्त समाजाची निर्मिती होते. शिक्षणाची पुरेशी सोय नसलेल्या भागात आरोग्य क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र डॉ. साळवे व इतर कॉलेजमधून मिळणाऱ्या नर्सिंग शिक्षणातून युवतींना सक्षम व स्वावलंबी होण्याची संधी निर्माण होते, असे प्रतिपादन नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. यशवंत पाटील यांनी केले.
धानोरा तालुक्यातील चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने ‘ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्ट’ या नृत्य व गायन स्पर्धेचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेदिक महाविद्यालय बुलढाणाचे डॉ. राजेंद्र वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून चातगावच्या सरपंचा नीता मडावी, डॉ. प्रमोद साळवे, डॉ. अमित साळवे, माजी सरपंच नारायण सयाम, माजी सरपंच नारायण सयाम, रवी करपे, हेमंत परगते, अमित रामने आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. राजेंद्र वाघ म्हणाले, नर्सिंगचा पेशा पत्करणाऱ्या युवतींना समाजपुढे बहिणीचा (सिस्टर) दर्जा मिळते. आजारपणामध्ये आपलेही लोक साथ देत नाही, अशावेळी नर्सेस त्यांची नि:स्वार्थ सेवा करतात, हे कार्य खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी समाजाला रोगमुक्त करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. प्रमोद साळवे यांनी साळवे नर्सिंग कॉलेजच्या वतीने सन २००६ पासून ‘ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्ट’ हा उपक्रम राबविला जात आहे. यातून नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवतींमध्ये आत्मविश्वास वाढत आहे, असे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका कावळे, संचालन प्राचार्य सविता सादमवार यांनी केले तर आभार डॉ. अमित साळवे यांनी मानले.
वनौषधी उद्यानाचे उद्घाटन
४डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजच्या वतीने नर्सिंग प्रशिक्षणासोबतच विद्यार्थिनींना वनौषधीचे महत्त्व पटवून देण्यासाठी वनौषधी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानात सध्या विविध ३२ प्रजातीच्या वनौषधीची लागवड करण्यात आली आहे. तसेच भाजीपाला व फूलझाडाची सुध्दा येथे लागवड करण्यात आली आहे. या उद्यानाचे उद्घाटन प्रा. डॉ. यशवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.