जुव्वी नाल्यावर रपटा बनविण्यास स्थानिकांचा विरोध
By Admin | Updated: September 19, 2016 02:01 IST2016-09-19T02:01:09+5:302016-09-19T02:01:09+5:30
भामरागड तालुक्यातील जुव्वी नाल्यावर रपटा बनविण्याचा निर्णय भूमकाल संघटनेने घेतला होता.

जुव्वी नाल्यावर रपटा बनविण्यास स्थानिकांचा विरोध
१० गावांच्या जनसभेत निर्णय : भूमकाल संघटनेवर विविध आरोप
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील जुव्वी नाल्यावर रपटा बनविण्याचा निर्णय भूमकाल संघटनेने घेतला होता. जुव्वी नाल्यातील पाण्याचा प्रवाह लक्षात घेता पाईप टाकून तयार करण्यात आलेला रपटा पावसाच्या पहिल्याच पाण्यात वाहून जाण्याची शक्यता असल्याने सदर रपटा केवळ फार्स ठरणार आहे. हे सर्व काही भूमकाल संघटना केवळ प्रसिध्दीसाठी करीत आहे. त्यामुळे रपटा निर्मितीस विरोध करीत असल्याचा निर्णय १७ सप्टेंबर रोजी आयोजित १० गावांच्या जनसभेमध्ये घेण्यात आला.
जनसभेला भटपार, कवंडे, मिर्झापल्ली, जुव्वी, धोडराज, गोंगवाडा, परथीनार, दरदा, घोटपाडा, येनगुंडा या १० गावांमधील शेकडो नागरिक उपस्थित होते. भूमकाल संघटनेचे अरविंद सोवनी त्यांची पत्नी रश्मी सोवनी, दत्ता शिर्के व त्यांचे साथीदार मागील चार-पाच महिन्यांपासून या परिसरात येऊन नदी, नाल्यांवर पूल बांधून देण्याचे खोटे व फसवे आश्वासन देत आहे. भूमकाल संघटना कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या संघर्षाला दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. भूमकाल संघटनेचे एकही कार्यकर्ते या परिसरातील नाही. स्वत:च्या प्रसिध्दीसाठी खोट्या विकासाचा आव आणला जात आहे.
जुव्वी नाला मोठा आहे. पावसाळ्यामध्ये या नाल्यामध्ये माणसापेक्षा अधिक पाणी राहते. त्यामुळे या नाल्यात पाईप टाकल्यास सदर पाईप पहिल्याच पावसात वाहून जातील. त्याचबरोबर या पाईपांवरूनही पाणी राहिल. त्यामुळे या रपट्याचा काहीच उपयोग होणार नाही. जागोजागी लोखंड, फुटलेल्या पाईपाचे तुकडे साचतील व मोठमोठे खड्डे पडतील. जे नागरिक आज सहजपणे पाण्यातून मार्गक्रमण करतात, ते खड्ड्यांमुळे शक्य होणार नाही. सलवा जुडूमचे कार्यकर्ते मधुकरराव यांच्याशी हात मिळवणी करून छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रातही अंतर्गत युध्द भूमकाल संघटना छेडू पाहत आहे. विकासच करायचा असेल तर शिक्षण, स्वास्थ, रेशन, रोजगार या समस्या सोडविण्यासाठी भूमकाल संघटनेने झटावे, असा निर्णय जनसभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)