विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन
By Admin | Updated: January 24, 2016 01:15 IST2016-01-24T01:15:07+5:302016-01-24T01:15:07+5:30
नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ व जनजागृती गणेश मंडळ गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी मार्गावरील सभागृहात शनिवारी ..

विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन
४० मंडळ होणार सहभागी : रविवारी बक्षीस वितरण कार्यक्रम
गडचिरोली : नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ व जनजागृती गणेश मंडळ गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी मार्गावरील सभागृहात शनिवारी सायंकाळी ७ वाजता विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा व कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व मालार्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. किरण मडावी, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश विधाते, माजी नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे, समशेर खॉ. पठाण, न.प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, केशव दशमुखे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. कुंभारे यांनी राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार व प्रसार भजन, कीर्तनाच्या माध्यमातून प्रभावी ठरते, असे भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण मुक्तावरम, संचालन मारोतराव इचोडकर यांनी केले. या विदर्भस्तरीय भजन स्पर्धेत जवळपास ४० मंडळ सहभागी झाल्या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा रविवारी समारोप होणार आहे. याप्रसंगी गौरी विठोले नागपूर येथील बाल कीर्तनकाराचे जाहीर कीर्तन रविवारी सायंकाळी ७ वाजता होणार असल्याची माहिती आयोजक प्रवीण मुक्तावरम यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)