बाबा आमटे अध्यासन केंद्र स्थापण्याचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: June 28, 2015 02:20 IST2015-06-28T02:20:31+5:302015-06-28T02:20:31+5:30
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेच्या सभेने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नावाने

बाबा आमटे अध्यासन केंद्र स्थापण्याचा मार्ग मोकळा
गोंडवाना विद्यापीठ : विद्वत्त समितीच्या बैठकीत मंजुरी
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेच्या सभेने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात विद्यापीठाला सूचना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार गोंडवाना विद्यापीठात स्व.बाबा आमटे अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय विद्वत परिषदेने घेतला आहे अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी दिली आहे.
कै. बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रकाशित टपाल तिकीटाचा सादरीकरण समारंभ चंद्रपुर येथे ४ जून ला झाला होता. त्या कार्यक्रमात वन व वित्त नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंडवाना विद्यापीठाने स्व.बाबा आमटे यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन करावे अशी सूचना आपल्या भाषणात केली होती. तत्संबंधाने त्यांनी कुलगुरु डॉ चांदेकर यांना लेखी पत्र सुद्धा दिले. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने स्व.बाबा आमटे यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. (जिल्हा प्रतिनिधी)