धान उघड्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:05 IST2018-04-23T00:05:10+5:302018-04-23T00:05:10+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सहकारी संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ६५ वर केंद्रावरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

धान उघड्यावरच
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सहकारी संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ६५ वर केंद्रावरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी १ लाख ९६ हजार १०५ क्विंटल धान भरडाईसाठी पाठविण्यात आला आहे. तर १ लाख २० हजार क्विंटल धान उघड्यावर असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी पाऊस झाल्याने जवळपास एक लाख क्विंटल धानाला पावसाचा फटका बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरमोरी तालुक्यात १० हजार ८९७ क्विंटल धान उघड्यावर आहे. कुरखेडा तालुक्यात ४२ हजार ४०१ क्विंटल, कोरची तालुक्यात ४२ हजार ५६५ क्विंटल, धानोरा तालुक्यात ९ हजार ४८८ क्विंटल, घोट परिसरात १५ हजार १९७ क्विंटल धान उघड्यावर आहे. तर आरमोरी तालुक्यात १७ हजार ४७४ क्विंटल धान गोदामात आहे. कुरखेडा तालुक्यात ५ हजार ७७६ क्विंटल, कोरची तालुक्यात ३३ हजार ५०५ क्विंटल, धानोरा तालुक्यात ३० हजार ८८३ क्विंटल, घोट परिसरात २३ हजार ८३५ क्विंटल तसेच अहेरी तालुक्यात ७८ हजार ५५४ क्विंटल असे एकूण १ लाख ९० हजार २९ क्विंटल धान गोदामा साठवून ठेवण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी २०१७-१८ च्या हंगामात करण्यात आली. आदिवासी विकास महामंडळांतर्गत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत ही धान खरेदी करण्यात आली. २०१७-१८ या वर्षाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती धानाचे ४० ते ५० टक्केच उत्पादन आले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाची फारशी आवक झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी २ लाख क्विंटलने घटली असल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाकडून मिळाली आहे.
गोदामाची वानवा
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थांच्या वतीने दरवर्षीच्या खरीप व रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. मात्र महामंडळाकडे तसेच संस्थांकडे धानाची साठवणूक करण्यासाठी पुरेशी गोदाम व्यवस्था नाही. त्यामुळे महामंडळाला दरवर्षीच लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागते.