ओपीडीला एक तास विलंब डॉक्टर लेटलतिफ
By Admin | Updated: June 30, 2015 02:22 IST2015-06-30T02:22:41+5:302015-06-30T02:22:41+5:30
स्थानिक कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात (ओपीडी) गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर

ओपीडीला एक तास विलंब डॉक्टर लेटलतिफ
दिगांबर जवादे/दिलीप दहेलकर /गोपाल लाजुरकर ल्ल गडचिरोली
स्थानिक कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात (ओपीडी) गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यातील रूग्ण दररोज मोठ्या संख्येने औषधोपचारासाठी येतात. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची गर्दी असते. सकाळी ८.३० ते १२ वाजेपर्यंत रूग्णालयाच्या ओपीडीचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. मात्र बाह्य रूग्ण विभागातील वैद्यकीय अधिकारी व काही कर्मचारी तब्बल एक तास उशिरा कर्तव्यावर येतात. परिणामी नागरिकांना तास-दीडतास डॉक्टरांची आरोग्य सेवेकरिता प्रतीक्षा करावी लागते.
बाह्य रूग्ण विभागाच्या परिसराची सफाई कर्मचाऱ्यांकडून सकाळी ९ वाजेपर्यंत स्वच्छता सुरू राहते. त्यामुळे बाह्य रूग्ण विभागाचा प्रवेशद्वारही सकाळी ९ वाजेपर्यंत बंद असतो. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या अनेक रूग्णांना प्रवेशद्वारासमोर ताटकळत राहावे लागते, असे काहीसे चित्र लोकमत चमूने सोमवारी सकाळी ८.१५ ते १० या वेळेत बाह्य रूग्ण विभागात केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले. लांब अंतरावरून आलेल्या वृध्द नागरिक, गरोदर माता व बालकांनाही डॉक्टरांच्या लेटलतीफपणामुळे मनत्रास सहन करावा लागतो, असे स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.
९.१० वाजता महिला रुग्णांच्या नोंदणीस प्रारंभ
बाह्यरुग्ण विभागात कोणत्याही डॉक्टरकडे रुग्णाला उपचार घ्यायचा असल्यास संबंधित रुग्णाला सर्वप्रथम पाच रूपये देऊन नोंदणी विभागात नोंदणी करून घ्यावी लागते. ८.५१ वाजता बाह्यरुग्ण विभागाचा दरवाजा उघडताच रुग्णांचा लोंढा सर्वप्रथम नोंदणीच्या ठिकाणी गेला. पुरूषांची नोंदणी करणारा कर्मचारी उपस्थित असल्याने पुरूषांच्या नोंदणीस सुरुवात झाली. मात्र महिलांची नोंदणी करणारा कर्मचारी ९.१० वाजतापर्यंत आला नाही. परिणामी महिलावर्ग रांगेत ताटकळत उभ्या असल्याचे दिसून आले. काही महिलावर्ग पुरूषांची नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला महिलांची नोंदणी करणारा कर्मचारी कधी येणार याबद्दल विचारत होते. ९.१० वाजता संबंधित कर्मचारी आल्यानंतर नोंदणीला सुरुवात झाली.
अनिल रूडे यांचा फेरफटका
जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी सोमवारी सकाळी ९.१० वाजता बाह्य रूग्ण विभागात येऊन फेरफटका मारला. कोणत्या विभागातील कोणते डॉक्टर तसेच कर्मचारी आले, आरोग्य सेवेचे काम सुरू झाले काय, याची चाचपणी डॉ. रूडे यांनी यावेळी केली. त्यांनी येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले.
८.५१ वाजता उघडले रूग्णांसाठी प्रवेशद्वार
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागाचे मुख्य प्रवेशद्वार रूग्णांकरिता ८.५१ वाजता उघडण्यात आले. त्यानंतर प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या रूग्णांनी आतमध्ये नोंदणी कक्षात येऊन नोंदणीस प्रारभ केला.