कृषी कार्यालयात उरले केवळ दोनच कर्मचारी
By Admin | Updated: January 16, 2016 01:53 IST2016-01-16T01:53:37+5:302016-01-16T01:53:37+5:30
१८४ गावातील हजारो शेतकऱ्यांचा भार वाहणाऱ्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी सुमारे १६ पदे मंजूर करण्यात आले आहेत.

कृषी कार्यालयात उरले केवळ दोनच कर्मचारी
१८४ गावांचा भार : अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची दैनावस्था
विवेक बेझलवार अहेरी
१८४ गावातील हजारो शेतकऱ्यांचा भार वाहणाऱ्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी सुमारे १६ पदे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे केवळ यातील दोनच पदे भरण्यात आली असून सुमारे १४ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाच्या अभावाने शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अडचण जात असून याचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.
तालुका कृषी अधिकारी हे कार्यालय राज्य शासनाच्या अखत्यारित येते. या कार्यालयाच्या वतीने कृषी विकासाच्या ८० टक्के योजना राबविल्या जातात. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कार्यालयाबरोबरच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयसुद्धा स्थापन करण्यात आले आहे. अहेरी तालुक्यात एकूण १८४ गावे आहेत. यापैकी १५८ आबादी गावे तर २६ रिठ गावे आहेत. एकूण १४ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ३ हजार ७५९ एवढी आहे. यातील ९० टक्के नागरिक शेती हा एकमेव व्यवसाय करतात. त्यामुळे कृषी विभागाचे अहेरी तालुक्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकूण १६ पदे मंजूर आहेत. यामध्ये १ तालुका कृषी अधिकारी, १ कृषी अधिकारी, १ कृषी पर्यवेक्षक, १ कृषी सहाय्यक, १ तालुका सहाय्यक, २ अनुरेखक, १ सहाय्यक अधीक्षक, १ वरिष्ठ लिपीक, ४ कनिष्ठ लिपीक, १ वाहनचालक व ३ शिपाई असे एकूण १६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी कृषी पर्यवेक्षक व कनिष्ठ लिपीक असे दोनच पदे भरण्यात आली असून उर्वरित सुमारे १४ पदे रिक्त आहेत. विविध शासकीय योजनांच्या कामासाठी शेतकरीवर्ग तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये येतात. मात्र या कार्यालयात शुकशुकाट राहते. कमी मनुष्यबळामुळे एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यास महिन्याचा कालावधी लागतो. कधीकधी तर योजनेचा कालावधीही निघून जातो. एकाच अर्जासाठी सतरावेळा या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. दुसरीकडे कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यामुळे कर्मचारीसुद्धा त्रस्त झाले असून पदे भरण्याची मागणी होत आहे.
३० वर्षांपासून कार्यालय भाड्याच्या खोलीत
जिल्हा निर्मितीबरोबरच अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचीही स्थापना करण्यात आली. मात्र या कार्यालयाला अजूनपर्यंत स्वतंत्र इमारत शासनाने बांधून दिली नाही. त्यामुळे सदर कार्यालय ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही भाड्याच्याच खोलीत सुरू आहे. कार्यालयासाठी कमी जागा उपलब्ध असल्याने दस्तावेज ठेवण्यासही अडचण निर्माण होत आहे.
मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील १७ पैकी १० पदे भरण्यात आली आहेत. तर ७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सेवक ४, अनुरेखक १ व शिपायाचा १ पद रिक्त आहे.